८६ घरे जळून खाक : १ कोटी ८६ लाख २0 हजारांचे नुकसान
By Admin | Updated: June 2, 2014 00:59 IST2014-06-02T00:59:45+5:302014-06-02T00:59:45+5:30
‘किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या’ या राष्ट्रसंतांच्या भजनाप्रमाणे आपल्या वस्तीत गुण्यागोविंदाने नांदणारी माणसं अचानक बेघर झाली.

८६ घरे जळून खाक : १ कोटी ८६ लाख २0 हजारांचे नुकसान
‘ गेल्या २0 वर्षांपासून अनेक मजूर, कंत्राटी कामगार, लघुउद्योग करणारे याठिकाणी वास्तव्यास आहेत. हातावर आणून पानावर खाणार्यांची अधिक संख्या आहे. मोठे दुमजली घर बांधता आले नसले तरी आपल्या कमाईतून टिनाचे पत्र, बांबू व तांटव्याच्या झोपड्या करून लोक याठिकाणी राहतात. घरातील प्रत्येक माणूस सकाळपासून सायंकाळपर्यंत तर कुणी रात्र पाळीतही सिमेंट कंपन्यांमध्ये कामाला जातो. त्यामुळे आलेल्या पैशातून राहण्याची सोय सर्वांनी केली. परंतु नियतीने घात केला. एका क्षणात झोपड्या उद्धवस्त झाल्या. अंगावरचे कपडे सोडता बाकी सारे जळून खाक झाले. काहींच्या घरी टीव्ही, कुलर, गोदरेज अलमारी, भांडी, सोनं आदी वस्तू होत्या. त्यामुळे आता काहीच उरलेले दिसत नसल्याने मायेचा हात कोण देईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आगीत जळालेल्या वस्तु, फुटलेले मडके, काळी पडलेली भांडी, जळालेले कपडे, फुटलेले कवेलु, धान्य आणि मोडलेल्या खाटा आदींचे चित्र मनाला गहीवरून टाकणारे आहे. गडचांदूरच्या आठवडी बाजारात मजुरी करून जगणारे मजूर, महिलाही याठिकाणी टाहो फोडताना दिसल्या. कधी स्वच्छ रस्ते, अंगणातील रांगोळ्या आणि वृंदावन अंगणात दिसणारे आंगण आज काळ्या धुव्याने बरबटलेले दिसत आहे. सर्वत्र संसाराची राखरांगोळी झालेली दिसत आहे. यातील अनेकांना निवारा कुठे शोधावा, असा प्रश्न आहे. नेहमी झोपडीत राहणार्या येथील नागरिकांना झोपडी जरी असली तरी ती हक्काची वाटत होती. परंतु आता ती झोपडी डोळ्यादेखत आगीत जळाल्याने कशी उभारावी, असा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे. अनेकांचे लाखांचे नुकसान झाले. काहींची जमा करून ठेवलेली पुंजी जळाली. अन्न, वस्त्र, निवारा या तिनही गोष्टींना येथील रहिवासी आज मुकले असून जगण्याचा आधार हरपल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. आज या वस्तीत केवळ दु:ख प्रसवले जात होते.