६ वर्षात ७५१ नोंदणी विवाह
By Admin | Updated: April 25, 2015 01:23 IST2015-04-25T01:23:43+5:302015-04-25T01:23:43+5:30
लग्न हे मंगल कार्य. मात्र या मंगल कार्यात मोठ्या प्रमाणात पैश्याचा अतिरिक्त अपव्यय होतो.

६ वर्षात ७५१ नोंदणी विवाह
लोकमत विशेष
मंगेश भांडेकर चंद्रपूर
लग्न हे मंगल कार्य. मात्र या मंगल कार्यात मोठ्या प्रमाणात पैश्याचा अतिरिक्त अपव्यय होतो. त्यातच गरीब कुटुंबाला तर खर्च आवाक्याबाहेरचा असतो. याला चंद्रपूर जिल्ह्यातील जोडप्यांनी आडफाटा दिला असून गेल्या सहा वर्षांत तब्बल ७५१ जोडप्यांचे नोंदणी पद्धतीने ‘शुभमंगल’ उरकण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीला तिलांजली देत आणि खर्च होणारा पैसा आणि श्रम यावर या नोंदणी विवाहाने आळा बसला, हे विशेष!
लग्न ठरले की लग्नाच्या तयारीला वेग येतो. लग्नपत्रिका, खरेदी, लग्नमंडपाची सजावट, अशा प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाते. लग्नाचा दिवस उजाडेपर्यंत कुटुंबातील सगळेच जण कामात व्यस्त असतात. नियोजन केल्याप्रमाणे सगळे काही व्यवस्थीत पार पडले, की झाले एकदाचे लग्न असे म्हणत, सुटकेचा नि:श्वास सोडला जातो. मात्र यात होणारी धावपळ, खर्च हे आजच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गरिब कुटुंबाचे तर लग्न कार्य म्हटले की, तोडांवरचे पाणी पळते.
मात्र या सर्व धडपडीतून नोंदणी विवाहामुळे सुटका मिळू शकतो. विशेष विवाह कायद्यानुसार केला जाणारा विवाह म्हणजे नोंदणी पद्धतीचा विवाह. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात विवाह नोंदणी अधिकाऱ्याकडे ही नोंदणी करता येते. हा विवाह करण्यापूर्वी एक नोटीस द्यावे लागते. विवाह नोंदणी अधिकाऱ्याकडे नोटीस देण्यासाठीचा अर्ज मिळतो. नोटीस संबंधित विवाह नोंदणी कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध केला जातो.
३० दिवस हे नोटीस कार्यालयाच्या सूचना फलकावर लावले जाते. या दरम्यानच्या काळात या विवाहावर कोणीही आक्षेप नोंदविले नाही, तर पुढील ६० दिवसांमध्ये विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. विवाह निबंधक कार्यालयात विवाह अधिकारी वधू-वर यांना तीन साक्षीदारांच्या समोर विवाहाची शपथ देतात. त्यानंतर संबंधित विवाह झाल्याची नोंद विवाह नोंदणी पुस्तिकेत करतात व वधू-वरांच्या स्वाक्षरी घेऊन विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर विवाह अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होऊन लगेच विवाह प्रमाणपत्र वधू-वरांना दिले जाते.
नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
वैदिक पद्धतीने किंवा कोणत्याही धार्मिक पद्धतीने लग्न झाले असले, तरी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असल्याशिवाय न्यायालयाच्या दृष्टीने हा विवाह ग्राह्य धरला जात नाही. विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे अतिशय महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे. लग्न झाल्याचा पुरावा म्हणून या कागदपत्राचे महत्त्व आहेच; पण विविध सरकारी कागदपत्रे काढण्यासाठीही या प्रमाणपत्राचा उपयोग होतो.