दोनशे रुपयांत उरकले 724 जोडप्यांनी लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST2021-07-29T05:00:00+5:302021-07-29T05:00:57+5:30
विवाह सोहळा सदैव स्मरणात राहावा, यासाठी नवदाम्पत्य हजारो आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या आशीर्वादाने धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवीत लग्नात वारेमाप खर्च करतात. मात्र, कोरोनाने विवाह सोहळ्याची परिभाषाच बदलविली आहे. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे निर्देश प्रशासनाचे असल्याने अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले. मात्र, कोरोनाच्या या संकटात २०२० मध्ये ४०५ जोडप्यांनी, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

दोनशे रुपयांत उरकले 724 जोडप्यांनी लग्न
परिमल डोहणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विवाह सोहळ्यात वारेमाप खर्च करण्याच्या पद्धतीला फाटा देत कोरोना संकटकाळात जिल्ह्यातील ७२४ जोडप्यांनी दोनशे रुपयांत नोंदणी पद्धतीने विवाह करून नवा आदर्श निर्माण केला आहे.
विवाह सोहळा सदैव स्मरणात राहावा, यासाठी नवदाम्पत्य हजारो आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या आशीर्वादाने धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवीत लग्नात वारेमाप खर्च करतात. मात्र, कोरोनाने विवाह सोहळ्याची परिभाषाच बदलविली आहे. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे निर्देश प्रशासनाचे असल्याने अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले. मात्र, कोरोनाच्या या संकटात २०२० मध्ये ४०५ जोडप्यांनी, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या जोडप्यांना विवाहासाठी १५० रुपये मॅरेज फी व ५० रुपये नोंदणी फी असा केवळ २०० रुपयांचा खर्च आला. विशेष म्हणजे, यापुढीलही काळामध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास लग्न असलेल्या घरच्या कुटुंबावर विशेषत: मुलीच्या वडीलांना येणारा आर्थिक तसेच मानसिक ताण कमी करता येईल.
२०२१ मध्ये नोंदणी वाढली
दरवर्षी जिल्ह्यात ३०० च्या जवळपास नोंदणी पद्धतीने विवाह सोहळे पार पडत होते. सन २०२० मध्ये जिल्ह्यात ४०५ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत ३१९ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडल्याची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात आहे. कोरोनाने सार्वजनिक विवाह सोहळ्याला निर्बंध असल्याने गरीब, सर्वसामान्यांसह नोकरदार व मोठ्या घराण्यातसुद्धा नोंदणी विवाहाला पसंती दिली आहे.
ऑनलाईन अप्लीकेशन गरजेचे
नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. यावेळी वधू आणि वरांनी वयाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. संपूर्ण कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर अर्ज केलेल्या दिवसापासून ३० दिवसानंतर आणि ९० दिवसांच्या आत लग्नाची तारीख दिली जाते. त्या दिवशी दोघांकडील साक्षीदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष विवाह पार पडतो.
केवळ २०० रुपये खर्च
वधू आणि वर हे दोघेही जर जिल्ह्यातीलच असतील, तर ५० रुपये नोंदणी शुल्क व १५० रुपये मॅरेज शुल्क असा दोनशे रुपयांचा, तर वर किंवा वधू दोघांपैकी एखादा जिल्ह्याबाहेरील असेल तर नोंदणी शुल्क १०० रुपये व मॅरेज शुल्क १५० असा २५० रुपयांचा खर्च येतो. नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते.
मागील वर्षापासून कोरोनाचे सावट आहे. यामध्ये जिल्ह्यातील युवकांचा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे कल आहे. दीड वर्षात ७२४ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले आहेत.
-बी. एन. माहोरे
विवाह अधिकारी, चंद्रपूर