चंद्रपूर जिल्ह्यात एचआयव्हीचे एका वर्षात ६६२ रुग्ण
By Admin | Updated: May 18, 2015 01:08 IST2015-05-18T01:08:50+5:302015-05-18T01:08:50+5:30
मागील काही वर्षांपासून एचआयव्ही होऊ नये म्हणून पुरुष व महिलांनी काळजी घ्यावी, यासाठी राष्ट्रीयस्तरावर एचआयव्ही निर्मूलन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात एचआयव्हीचे एका वर्षात ६६२ रुग्ण
वरोरा : मागील काही वर्षांपासून एचआयव्ही होऊ नये म्हणून पुरुष व महिलांनी काळजी घ्यावी, यासाठी राष्ट्रीयस्तरावर एचआयव्ही निर्मूलन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. असे असतानाही चंद्रपूर जिल्ह्यात मागील एका वर्षांत ६३२ एचआयव्ही रुग्ण तपासणीमध्ये आढळून आले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी रुग्णांची संख्या कमी असल्याचे मानले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात एचआयव्हीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे मागील काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात एचआयव्ही निर्मूलनासाठी शासनाकडून सामाजिक संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. तसेच तालुका व ग्रामीणस्तरावरही शासकीय रुग्णालयांत तपासणी केंद्र तसेच औषधी उपचार व मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली. गरोदर स्त्रीयांना एचआयव्ही तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. अशा चंद्रपूर जिल्ह्यातील या वर्षात ५१ हजार ८७२ स्त्री व पुरुषांची तपासणी करण्यात आली. त्यात ६३२ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ६२८ रुग्णांनी औषधोपचारासाठी नोंदणी केली आहे. नियमीत औषधोपचार घेतल्यास या आजाराची तीव्रता कमी होते, याबाबत रुग्णांमध्ये औषधी उपचारासोबतच जनजागृती व मार्गदर्शन विविध केंद्रावरुन करण्यात येते. शासकीय रुग्णालयात चंद्रपूर जिल्ह्यात ४२ हजार २७८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यात ४४ माता बाधित असल्याचे आढळून आले आहे. गरोदर माता एचआयव्हीने बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही शासकीय रुग्णालयात या मातांची प्रसूती केली जात आहे. त्यामुळे अनेक गरोदर माता उपचारासाठी तसेच प्रसूतीकरिता शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
मातापिता एचआयव्ही परंतु बालके नाही
मागील काही वर्षांत माता व पित्याला एचआयव्ही असेल तर त्यांना जन्माला आलेल्या बालकांनाही एचआयव्हीची बाधा होत असे. परंतु प्रसुती अगोदरच्या तपासणीत माता व पित्याला एचआयव्ही असल्यास त्यांच्यावर औषधी उपचार करण्यात येत असल्याने अशा दाम्पत्याच्या मुलाला एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.
एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्हमध्ये पाठ
पती किंवा पत्नीला एचआयव्हीची बाधा झाली असेल तर काही दिवसात दोघांनाही त्याची बाधा झाल्याचे आढळून येत होते. परंतु सध्या स्त्री व पुरुषांची तपासणी वेळीच करण्यात येते. यामध्ये एकाला बाधा असल्यास त्यांना काळजी घेण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याने सध्या पती व पत्नीमध्ये एकच पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण वाढले आहे.
जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून सामाजिक संघटनाही एचआयव्ही मुक्त करण्याकरिता चांगले कार्य करीत आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागात विविध ठिकाणी तपासणी केंद्र औषध उपचार व मार्गदर्शन केंद्र उभारल्याने नागरिकांमध्ये जागृती चांगली झाल्याने दिवसागणिक एचआयव्ही बाधितांची संख्या कमी होत आहे.
- सुमन पनगंटीवार, कार्यक्रम अधिकारी