६५ उंबरठ्यांचे गाव सोयीसुविधांपासून वंचित
By Admin | Updated: August 30, 2015 00:39 IST2015-08-30T00:39:32+5:302015-08-30T00:39:32+5:30
तालुक्यात शेवटच्या टोकावर ६५ उंबरठ्यांचे आसेगाव नावाचे गाव आहे. आदिवासी पाडा गिलबिली गट ग्रामपंचायतीत असून सरकारी सर्वेक्षणाचा फटका येथील नागरिकांना बसला आहे....

६५ उंबरठ्यांचे गाव सोयीसुविधांपासून वंचित
आसेगावची व्यथा : सरकारी सर्वेक्षणाचा आदिवासींना फटका
अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर
तालुक्यात शेवटच्या टोकावर ६५ उंबरठ्यांचे आसेगाव नावाचे गाव आहे. आदिवासी पाडा गिलबिली गट ग्रामपंचायतीत असून सरकारी सर्वेक्षणाचा फटका येथील नागरिकांना बसला आहे. येथे दारिद़्र्य रेषेखालील सर्वेक्षणात केवळ सात उंबरठ्यांचा समावेश करण्यात आला. परिणामी शासनाच्या इंदिरा आवास योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. यामुळे आज घडीला आसेगाव मूलभूत सोयीसुविधांपासून नागरिक वंचित आहेत.
तालुक्यातील गिलबिली ग्रामपंचायतीमध्ये आसेगाव व मोहाडी तुकूम ही गावे समाविष्ट आहेत. येथे एकूण लोकसंख्या एक हजार ६७१ इतकी आहे. यामध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या १ हजार ३५० आहे. ८० टक्के आदिवासी बांधव वास्तव्याला असूनही त्यांच्या सर्वेक्षणात सरकारी यंत्रणेने गफलत केली. यामुळे अनेक शासकीय योजनांचा लाभ येथील नागरिकांना मिळत नाही. हलाखीच्या परिस्थितीमुळे आसेगावात अनेकांच्या घरांची पडझड झाली. संसार उघड्यावर आले आहेत. दारिद्र्य रेषेखालील यादीत नसल्याने इंदिरा आवास योजनेतील घरकुलाचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे.
शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सन २००२-०७ वर्षातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सर्वचस्तरातील योजनेचा लाभ देण्यात येतो. याला अपवाद मात्र आसेगाव ठरले आहे. बीपीएल कुटुंब नाममात्र ठरविण्यात आल्याने शासनाच्या विविध योजनेचा लाभ येथील नागरिकांना घेता येत नाही. स्वातंत्र्याच्या ६९ वर्षातही आदिवासींवर अन्यायाचे धोरण जाणिवपूर्वक लादण्यात आल्याची भावना येथील नागरिकांत व्यक्त केली जात आहे. निवडणुकीतील प्रचारादरम्यान नेत्यांनी नागरिकांना आश्वासने दिली. मतांचा जोगव्यासाठी आदिवासी समाज बांधवांना भ्रमित करण्यात आले. मात्र त्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यास आजतागायत कोणीही पुढाकार घेतला नाही.
जुनोना-पोंभूर्णा मार्गावरील आसेगावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी याच इमारती सुस्थितीत आहेत. मात्र अंतर्गत घराची पडझड झाली आहे. येथे बोटावर मोजण्या इतपत लोक शेती करतात. अनेकांना मोलमजुरी करून उदरनिर्वाह करावा लागतो. नेहमीच हाताला काम मिळते असे नाही. तुटपुंज्या मजुरीवर संसाराचा गाडा चालवावा लागतो. अशातच कित्येक वर्षापासून तग धरून असलेले निवारे मोडकळीत आले. घराची डागडुजी करण्या इतपत पुंजी नाही. घरकुलाच्या योजनेचा लाभही नाही, अशी अवस्था येथील आदिवासी कुटुंबांची झाली आहे. याला कारणीभूत दारिद्र्य रेषेखालील २००२-०७ सालची जनगणना ठरली आहे.
आदिवासींचे गाव असूनही दारूबंदी
बल्लारपूर तालुक्यात आसेगाव १०० टक्के आदिवासी पाडा आहे. समाजात समाजाची गणना व्यसनी म्हणून केली जाते. संस्कृतीचा वसा म्हणून याकडे पाहण्यात येते. मात्र येथील तरुणांनी आदर्श निर्माण केला आहे. गावात कोणालाही दारूचा व्यवसाय करू दिला जात नाही. यामुळे गावात तंट्याचे प्रमाण कमी आहे. गावात शिक्षणाबद्दलची उदासीनता दिसत असली तरी याला कारणीभूत प्रतिकूल परिस्थिती आहे. शतप्रतिशत आदिवासींचे गाव असूनही दारूबंदी असल्याने नवा आदर्श निर्माण करण्याकडे गावकऱ्यांची वाटचाल प्रेरणा देणारी आहे. आदिवासींचे जीवनमान उंचावणाऱ्या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी शासकीय पातळीवरील यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गावकऱ्यांना घरकुलाची प्रतीक्षा
आसेगावात एकूण ६५ आदिवासी कुटुंब वास्तव्याला आहेत. यातील केवळ सात कुटुंब दारिद्र्य रेषेखालील यादीत आहे. सन २००२-०७ च्या बीपीएल सर्वेक्षण गावातील नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरले. सदोष सर्वेक्षणामुळे आदिवासी पाड्यातील नागरिकांना एक लाख रुपये किमतीचे इंदिरा आवास योजनेतील घरकुलाच्या लाभापासून कित्येक वर्षापासून वंचित आहेत. जातीनिहाय आर्थिक जणगणनेचा सोपस्कार पार पडला आहे. यादीचे प्रकाशन अजून बाकी आहे. निवारा कमकुवत झालेल्या नागरिकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे.