जि.प.च्या 62 गटांवर झाले शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST2022-06-03T05:00:00+5:302022-06-03T05:00:34+5:30
जिल्हा परिषदेत मागील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ५६ गट होते. तर पंचायत समित्यांमध्ये ११२ गणांचा समावेश होता. त्या निवडणुका २००१ च्या जनगणनेनुसार झाल्या होत्या. आता २०११ च्या जनगणनेनुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक होणार असून, गट व गणांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढली आहे. जिल्हाभरात ६ गट आणि १२ गणांची संख्या वाढणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

जि.प.च्या 62 गटांवर झाले शिक्कामोर्तब
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या ६२ गटांवर शिक्कामोर्तब झाले असून, पंचायत समित्यांचे १२४ गण राहणार आहेत. येत्या ८ जूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी हरकती मागितल्या आहेत. २७ जूनपर्यंत अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावरून अजूनही निश्चित निर्णय झाला नसल्याने ग्रामीण भागातील अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
जिल्हा परिषदेत मागील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ५६ गट होते. तर पंचायत समित्यांमध्ये ११२ गणांचा समावेश होता. त्या निवडणुका २००१ च्या जनगणनेनुसार झाल्या होत्या. आता २०११ च्या जनगणनेनुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक होणार असून, गट व गणांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढली आहे. जिल्हाभरात ६ गट आणि १२ गणांची संख्या वाढणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते; परंतु राज्य शासनाने यासंदर्भात एक अधिसूचना काढून प्रारूप प्रभाग रचनेचे अधिकार शासनाकडे घेतले. त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; परंतु राज्य शासनाच्या अधिसूचनेमुळे पुन्हा ही प्रक्रिया लांबणीवर पडली.
आता राज्य निवडणूक आयोगाने एक अधिसूचना काढून प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासंदर्भात अजूनही ठोस निर्णय झाला नसला तरी गट आणि गणांच्या संख्येवर शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांच्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट व गणांचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून येत्या ८ जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहे. २२ जूनपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्तांकडे निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर २७ जून रोजी शासनाच्या राजपत्रात अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे. गट आणि गणामुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
ओबीसी उमेदवारांचे काय ?
- जिल्ह्यात प्रभाग रचना प्रसिद्द्ध तकेली असली तरी ओबीसी आरक्षणाचा निर्णय अद्यापही झाला नाही. त्यामुळे इच्च्छुक ओबीसी उमेदवारांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.