६०० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिचा ठेंगा

By Admin | Updated: January 24, 2016 00:51 IST2016-01-24T00:51:44+5:302016-01-24T00:51:44+5:30

चंद्रपूर तालुक्यातील सिनाळा आणि भटाळी या गावातील सुमारे ६०० प्रकल्पग्रस्त शेतकरी सध्या वेकोलिच्या बेमुर्वतपणाचा अनुभव घेत आहेत.

600 beneficiaries of the project will be vaccinated | ६०० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिचा ठेंगा

६०० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिचा ठेंगा

१५० कोटींचा मोबदला थकीत : नरेश पुगलियांनी दिला आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील सिनाळा आणि भटाळी या गावातील सुमारे ६०० प्रकल्पग्रस्त शेतकरी सध्या वेकोलिच्या बेमुर्वतपणाचा अनुभव घेत आहेत. या दोन्ही गावांमिळून एक हजार ८०० एकर शेतीचे मालक असलेले शेतकरी वेकोलिच्या नाठार भूमिकेमुळे हतबल झाले आहेत. दरम्यान, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढावू भूमिका घेतली असून शेतकऱ्यांना १५० कोटींहून अधिक सव्याज मोबदला आणि नोकरी न दिल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत भटाळी आणि सिनाळा येथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. या संदर्भात माहिती देताना पुगलिया म्हणाले, भटाळी आणि सिनाळा येथील शेतकऱ्यांचा वेकोलिसोबत भूमी अधिग्रहणासाठी करार झाला आहे. या दोन्ही गावांमिळून अनुक्रमे ७०० आणि ११०० एकर शेतजमीन आहे. या शेतीची किंमत सुमारे दिडशे कोटी रूपये आहे. भटाळीतील शेतकऱ्यांसोबत १८ महिन्यांपूर्वी तर सिनाळातील शेतकऱ्यांसोबत वर्षभरापूर्वी वेकोलिने करार केला आहे.
शासनाच्या धोरणानुसार, वेकोलिने प्रकल्पग्रस्तांना नोकरीची हमी दिली होती. करार करताना तत्परता दाखविणारे वेकोलिचे अधिकारी आता प्रत्यक्षात मोबदला देताना मात्र मागेपुढे पहात आहेत. प्रकल्पग्रस्त युवक नोकरीची वाट बघत आहेत. शेतीचा पुरेसा मोबदला न मिळाल्याने या शेतकऱ्यांचे खरेदी व्यवहारही अडले आहेत. अनेकांच्या तर इसाराची रक्कमही बुडाली आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवूनही न्याय मिळाल्याने हे शेतकरी आता हतबल झाले आहेत.
दुसरीकडे नोकरीची प्रतीक्षा करीत युवकांचे वय वाढत जात आहे. वय झाले असतानाही बेरोजगार म्हणून वावरावे लागत असल्याने तेदेखील आता त्रस्त झाले आहेत.
एवढ्या दिवसानंतरही मोबदला मिळाला नसल्याने आता वेकोलिने व्याजासह रक्कम द्यावी, अशी मागणी नरेश पुगलिया यांनी यावेळी केली. या शेतकऱ्यांच्या हालाखीच्या परिस्थितीला केवळ वेकोलि जबाबदार असून त्यांनी यावर तात्काळ मार्ग काढावा, अन्यथा विदर्भ किसान कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक आर.के. मिश्रा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोळसामंत्री पीयूष गोयल, कांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण आदींना या शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

बागायती शेती दाखविली कोरडवाहू
मागील १० ते १२ वर्षांंपासून बागायती शेती, फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची शेतजमीन कोरडवाहू दाखविण्याचा प्रताप वेकोलिने केला आहे. कमी मोबदला देणे हा त्यामागील उद्देश असल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे. अनेकांच्या शेतात बोअरवेल, विहिरी आहेत. संत्रा, चिक्कू, पेरू, फणस, लिंबांची झाडे आहेत. एकरी लाखो रूपयांचे उत्पन्न घेणारे शेतकरी वेकोलिच्या धोरणामुळे धास्तावले आहेत. मुकूंद आंबेकर, शरद राजणे यांच्यासह अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत. राज्य सरकारच्या निकषानुसार पुनर्वसानाचे धोरण राबवावे, अशी मागणी असली तरी नवे सरकार अन्यायच करत असल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Web Title: 600 beneficiaries of the project will be vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.