६० जणांनी केला अवयवदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:34 IST2018-05-04T23:34:56+5:302018-05-04T23:34:56+5:30
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष व अवयव दानाचे समर्थक अमोल डुकरे यांचे २४ एप्रिलला निधन झाले. त्यांचा विवाह बुधवारी नियोजित होता.

६० जणांनी केला अवयवदानाचा संकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष व अवयव दानाचे समर्थक अमोल डुकरे यांचे २४ एप्रिलला निधन झाले. त्यांचा विवाह बुधवारी नियोजित होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मित्र परिवारातील ६० नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.
‘मरावे परि कीर्ती रुप उरावे’ अशी म्हण आहे. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकतो. पण, अवयवदानाचे प्रमाण कमी असल्याने अनेकांना अवयवांची प्रतीक्षा करीत दिवस ढकलावे लागते. याची जाणीव ठेवूनच अमोल डुकरे यांनी स्वत:च्या विवाह सोहळ्यात पत्नी, आप्तजन व मित्र परिवारासह अवयव दान करण्याचा संकल्प जाहीर केला होता. मात्र लग्नापूर्वीच त्यांचे हृदय विकाराने निधन झाले. त्यामुळे मित्र परिवाराने बुधवारी स्थानिक गांधी बागेत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मार्गदर्शक म्हणून मोहन फाऊंडेशनचे बुलू बेहेरा, सचिव सुरज वरघने, नगर परिषदचे उपाध्यक्ष अनिल झोटिंग, साईनाथ ब्लड बँकेचे डॉ अनिल ढोणे, राहुल भोयर, रोटरीचे अध्यक्ष डॉ. विवेक तेला, महेश भगत योगिता लांडगे आणि अमोल डुकरे यांच्या मातोश्री मंचावर उपस्थित होत्या. यावेळी ढोणे यांनी रक्तदान तसेच बेहेरा यांनी अवयवदानाविषयी मार्गदर्शन केले. अमोलच्या विचारांची प्रेरणा घेवून उपस्थितांनी अवयवदानाचा संकल्प केला. कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर पार पडले. संचालन आशिष घुमे यांनी केले. आभार रुपेश घागी यांनी मानले. यावेळी संदीप झाडे, सुरज घुमे, गणेश उराडे, निलेश ढवस, तुषार कडू, ओम चावरे, दीपक गोंडे व मित्र परिवार उपस्थित होता.