चिमूर तालुक्यातील ५० टक्के शेती पडीत
By Admin | Updated: August 31, 2014 23:42 IST2014-08-31T23:42:09+5:302014-08-31T23:42:09+5:30
निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या उदासीनतेमुळे चिमूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तर यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

चिमूर तालुक्यातील ५० टक्के शेती पडीत
अमोद गौरकार - शंकरपूर
निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या उदासीनतेमुळे चिमूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तर यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. तालुक्यातील ५० टक्के जमिन यावर्षी पडीत आहे.
चिमूर तालुक्यातील ८० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. तालुक्यात मोठा उद्योग नसल्याने तालुक्यातील नागरिकांचे शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. त्यातही शेकडो एकर शेतजमीन चनसल्याने कोरडवाहू शेतीवरच भर दिल्या जात आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीने खचून न जाता यावर्षी चांगली शेती करावी, या नव्या जिद्दीने शेतीकरी कामाला लागले. परंतु, याहीवर्षी निसर्गाने दगा दिला.
अर्धा हंगाम जाऊनही समाधानकारक पाऊस झाला नाही. अत्यल्प पावसामुळे पिके सुकत आहेत. तर भात पिकाची अजूनही लागवड झाली नाही. त्यामुळे यावेळी धानपिक होणारच नाही. तर ज्यांनी कापूस व सोयाबीन पिके घेतली त्याही पिकावर रोगांचा प्रादुर्भावामुळे तेही पिके करपल्या जात आहे.
चिमूर तालुक्यात ७० हजार २३६ हेक्टर जमीन पिक क्षेत्राखाली येते. यातील १२ हजार १९९ हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तर उर्वरीत ५८ हजार हेक्टर जमीन कोरडवाहू आहे. त्यामुळे निसर्गाची साथ मिळाली तरच चिमूर तालुक्यातील शेतीत भरघोस उत्पन्न मिळते. यावर्षी सुरवातीपासूनच पावसाने दगा दिला. ज्यांनी शेतात काहीच पेरले नाही, त्यांच्या जमिनी आजही पडीत आहे. तर ज्यांनी सोयाबीन व कापूस पेरले आहेत, तेही पावसाअभावी करपू लागले आहे. करपलेले पिके पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रु आवरणे कठीण झाले आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन तत्काळ आर्थिक मदत वितरीत करण्याची मागणी जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून होत आहे.