रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ७२ तासांच्या आतच ४४७ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST2021-06-03T04:20:35+5:302021-06-03T04:20:35+5:30
एप्रिल-मे महिन्यात कोरोना संसर्गाचा भयानक उद्रेक झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. पहिल्या लाटेदरम्यान केलेल्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडल्या. ...

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ७२ तासांच्या आतच ४४७ रुग्णांचा मृत्यू
एप्रिल-मे महिन्यात कोरोना संसर्गाचा भयानक उद्रेक झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. पहिल्या लाटेदरम्यान केलेल्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडल्या. ऑक्सिजन बेडस् आणि व्हेंटिलेअर्स उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासनाची प्रचंड धावपळ झाली. कोविड केअर सेंटरपासून तर कोविड हॉस्पिटल उभारून त्यामध्ये सुविधा निर्माण करताना तारांबळ झाली. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाइकांनी केला. परिणामी ऑक्सिजन पुरवठ्यापासून औषधी, व्हेंटिलेटर्स आणि पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासन कामाला लागले. खासगी हॉस्पिटल्स कोविडसाठी ताब्यात घेतली. ३२ कोविड केअर सेंटर, ३३ डेडिकेडेट कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेडेट कोविड फॅसिलिटिजची व्यवस्था होऊ शकली; परंतु जिल्ह्यात १ जून २०२१ पर्यंत १४५४ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी एप्रिल महिन्यातील ८४९ मृत्यूचा विश्लेषण अहवाल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला. यामध्ये ४४७ रुग्णांचे मृत्यू उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ७२ तासांत झाल्याचे नमूद केले आहे.
एप्रिल महिन्यातील डेथ परसेंट
एप्रिल महिन्यात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांत १२० (१४.३० टक्के), ४८ तासांत १४६ (१७.१९ टक्के), ७२ तासांनंतर १३४ (१५.७८ टक्के), गृह विलगीकरणात दोन (०.२३ टक्के) आणि ७२ तासांच्या आत ४४७ (५२.६५ टक्के), अशा एकूण ८४९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नोंदविले आहे.
एकूण रुग्ण ८२०९३
उपचारानंतर बरे झालेले रुग्ण ७९ हजार ११६
व्हेंटिलेटर लावावे लागलेले रुग्ण १२००
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ११.१५
६३ व्हेंटिलेटर शिल्लक
जिल्ह्यात ९९ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. आरटीपीसीआर व अँटिजन चाचण्या वाढवूनही सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या उतरणीला लागली आहे. त्यामुळे केवळ ३६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, ६३ व्हेंटिलेटर (३६.३६ टक्के) शिल्लक आहेत.
५६६ ऑक्सिजन बेडस् रिकामे
कोरोनाचा उद्रेक पीक पॉइंटला गेल्यानंतर ऑक्सिजन बेडस्ची संख्या अपुरी पडली होती. मात्र, प्रशासनाने एक हजार ६१ ऑक्सिजन बेडस्ची व्यवस्था केली. आता रुग्णसंख्या कमालीची घटल्याने ५६६ ऑक्सिजन बेडस् रिकामे आहेत. सद्य:स्थितीत २८२ आयसीसी उपलब्ध असून, २०५ रुग्ण उपचाराखाली आहेत, तर ७७ आयसीयू शिल्लक आहेत.