एटीएम कोड मागून ४२ हजारांनी फसवणूक
By Admin | Updated: May 18, 2017 01:12 IST2017-05-18T01:12:08+5:302017-05-18T01:12:08+5:30
सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्या व कर्जमाफी हा विषय ऐरणीवर असताना कोणीही शेतकऱ्यांना आधार देण्यास तयार नाही.

एटीएम कोड मागून ४२ हजारांनी फसवणूक
शेतकऱ्याला फटका : कापूस विकून बँकेत टाकले होते पैसे
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्या व कर्जमाफी हा विषय ऐरणीवर असताना कोणीही शेतकऱ्यांना आधार देण्यास तयार नाही. अशा परिस्थिती शेतात वर्षभर राबून परिश्रमातून आपल्या वर्षभर आपले घर चालेल इतकी रक्कम जमा करून बँकेत ठेवली. परंतु या शेतकऱ्याला ‘तुमचे ए.टी. एम. बंद झाले आहे’, असे फोनवरून सांगून एका भामट्याने त्याच्या बँक खात्यातून चक्क ४२ हजार रुपये लंपास केल्याचे बुधवारी उघडकीस आले.
भद्रावती तालुक्यातील कारेगाव येथील नरेश कमलाकर लभाने (४०) यांचे वरोरा येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बचत खाते आहे. त्यांच्याकडे बँकेचे एटीएमहीे आहे. ते बुधवारी हा काही कामानिमित्त भद्रावती येथे गेले होते. आपले काम आटोपल्यावर ते वरोरा येथे राहत असलेल्या बहिणीकडे जाण्यास एसटीमध्ये बसताच त्यांना एक अनोळखी क्रमांकावरून फोन आला. ‘मी मुंबई येथील कार्यालयातून बोलत असून तुमच्याकडे असणारे एटीएम बंद झाले आहे’, असे तो सांगू लागला. त्यावर नरेश लभाने यांनी ते सुरू करून देण्यास सांगितले. तेव्हा त्याला एटीएम काढून आधी त्यावरील अंक आणि पैशाबाबत विचारणा केली. या भोळ्या शेतकऱ्याने त्याला सर्वच सांगितले.
ही सर्व प्रक्रिया झाल्यावर ‘तुमच्या मोबाईलवर एक एस. एम. एस. येईल. तो मला सांगायचा आणि लगेच तुमचे एटीएम सुरु होईल’, अशी बतावणी केली. त्यानंतर लभाने यांना चार वेळा थोडे-थोडे करीत ४२ हजार रुपयांनी गंडविण्यात आले. काही वेळानंतर लभाने यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वरोरा येथील स्टेट बँक गाठली. तेथे एटीएम ब्लॉक केले. त्यानंतर वरोरा पोलीस ठाण्यात या फसवणुकीची तक्रार दाखल केली.
शेतकऱ्यांना डिजिटल सेवेबद्दल जागृतीची गरज
केंद्र सरकारने जुन्या ५०० व १०००च्या नोटा बंद केल्या आहेत. पंतप्रधान यांनी जनतेला आॅनलाईन व्यवहार करण्यावर भर देण्यास सांगितले आहे. पण पाहिजे तेवढी संगणक साक्षरता नसल्याने आणि शासनाने जागृती न केल्याने नरेश लभाने यांच्यासारखे अनेक शेतकरी हॅकर्सच्या बतावणीला बळी पडत आहेत.