एका तपात ४१६ शेतकऱ्यांनी संपविले जीवन
By Admin | Updated: August 12, 2014 23:40 IST2014-08-12T23:40:25+5:302014-08-12T23:40:25+5:30
निसर्गाची अवकृपा, वाढती महागाई, मजुरांचा तुटवडा तसेच शासन, प्रशासनाचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेतकरी शेती करताना नाकीनऊ येत आहे.

एका तपात ४१६ शेतकऱ्यांनी संपविले जीवन
चंद्रपूर : निसर्गाची अवकृपा, वाढती महागाई, मजुरांचा तुटवडा तसेच शासन, प्रशासनाचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेतकरी शेती करताना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे कधी बँकेचे, बचत गटाचे तर, कधी सावकारी कर्ज घेऊन दरवर्षी नव्या आशेने शेतकरी शेती करतात. मात्र त्यांच्या खात्यात नैराश्यच येत आहे. कर्जाचा डोंगर सतत वाढल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मागील १२ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ४१६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २००३ पासून जुलै २०१४ पर्यंत एकूण ४१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील २८६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाने पात्र ठरविल्या आहे. त्यांना २ कोटी ८६ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
बेभरोवशाचा व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेती व्यवसायातून शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागते. त्यातच प्रशासकीय अडचणीही कमी नाही. जिल्ह्यात सिंचन क्षेत्र कमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय केली त्यांना वीज मिळत नसल्याची स्थितीही आहे.
निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची तर, स्थिती बिकट आहे. त्यामुळे यावर्षी नाही तर, पूढील वर्षी उत्पन्न होईल, या आशेवर शेतकरी शेती करतात. मात्र काही वेळा त्यांना यातून मार्ग काढता येत नाही. त्यातच अनेकजण आपले जीवन संपवत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळण्यासाठीही अनेक अडचणी येतात.
जिल्हा समितीद्वारे प्रथम आत्महत्येचे कारण शोधल्या जाते. या समितीमध्ये १४ सदस्यांचा समावेश आहे.
त्यानंतर पूर्ण माहिती गोळा केल्यानंतर आर्थिक मदत दिल्या जाते. ४१६ शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये १८६ शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी पात्र तर, १२८ शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यातील २ प्रकरणांची चौकशी सुरु आहे. आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)