३८ गावे नळ योजनेच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST2021-01-23T04:29:13+5:302021-01-23T04:29:13+5:30

नागभीड : सर्वांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचे शासनाचे धोरण आहे आणि गेल्या १५ वर्षापासून पाणी पुरवठ्याच्या विविध ...

38 villages waiting for plumbing scheme | ३८ गावे नळ योजनेच्या प्रतीक्षेत

३८ गावे नळ योजनेच्या प्रतीक्षेत

नागभीड : सर्वांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचे शासनाचे धोरण आहे आणि गेल्या १५ वर्षापासून पाणी पुरवठ्याच्या विविध योजना सुरू असल्या तरी नागभीड तालुक्यात ३८ गावांमध्ये नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याची माहिती आहे. या ३८ गावांना अद्यापही नळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.

जवळपास गेल्या १५ वर्षापासून नागभीड तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून नळयोजनांचे काम सुरू आहे. यात जलस्वराज्य योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अशा विविध योजनांचा यात समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून अनेक गावातील पेयजल योजनांचे काम मार्गी लागले असले तरी ३८ गावे नळयोजनेच्या प्रतीक्षेतच आहेत.

नागभीड तालुक्यात एकूण १०२ गावे आहेत. यातील पाच गावे रिठी आहेत.नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी शासन विविध पातळ्यांवर कार्यरत असून विविध योजनांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करीत आहे. जलजीवन मिशन ही त्यापैकीच एक योजना असून येत्या एप्रिल महिन्यापासून या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.

बॉक्स

या गावांना आहे प्रतीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार ज्या गावांना नळाच्या पाण्याची प्रतीक्षा आहे, त्यात मांगली, आलेवाही, उमरगाव, गायमुख, नवानगर, पारडी जाटीन, राजोली, देवपायली, सोनुली, इरव्हा, खरबी, सापेपार माल, खडकी, सोनुली (कन्हाळागाव), कोरधा, कोसंबी चक, कोसंबी गवळी, कोटगाव, किरमिटी मेंढा, खैरी चक पारखी, कोदेपार, मिंथूर, कचेपार, नवेगाव हुंडेश्वरी, चिंचाळा, पारडी, रानपरसोडी, कसर्ला, कुनघाडा, पेंढरी, रेंगातूर, सारंगड, लखमापूर, सावर्ला, सोनापूर तुकूम, धामणगाव चक, धामणगाव माल आणि येनोली चक या गावांचा यात समावेश आहे. यात उल्लेखनीय बाब अशी की, यातील १० ते १२ गावांमध्ये वरील काही योजनांच्या माध्यमातून पाच सहा वर्षापासून नळयोजना मंजूर आहेत.पण त्या आजही अपूर्ण आहेत.यात मिंथूर, मिंडाळा, कोटगाव, कोर्धा, मेंढा अशा काही गावांचा समावेश आहे. या योजनांवर शासनाचा लाखो रुपयांचा निधीही खर्च झाला आहे. मात्र ही गावे अद्यापही नळाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: 38 villages waiting for plumbing scheme