परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात गंभीर गुन्हे करून अनेक वर्षापासून अट्टल गुन्हेगार फरार झाले आहेत. त्यांना वाँटेड म्हणून घोषित केले असून, त्यांचा आकडा २०२४ मध्ये ३५३ झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या आकडेवारीत वाढ झाली आहे. खून, दरोडा, बलात्कार, विनयंभग, फसवणूक, मारामारी आदी गंभीर गुन्ह्यांत आरोपी फरार आहेत. ते मिळत नसल्याने त्यांचा जाहीरनामा काढून न्यायालयाच्या आदेशाने वाँटेड घोषित केले जाते. प्रत्येक वर्षी अशा गुन्हेगारांमध्ये वाढ होत चालली आहे.
गुन्हेगार जातात तरी कुठे? प्रत्येक वर्षी वाँटेड गुन्हेगारांचा आकडा वाढत चालला आहे. जिल्ह्यात गुन्हा केल्यानंतर हे आरोपी इतर जिल्ह्यांत किंवा परराज्यांत जात असल्याचे सांगण्यात आले. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना मोठी दमछाक करावी लागते.
दुसऱ्या नावाने वास्तव्य वाँटेड असणारे आरोपी जिल्ह्यातून इतर ठिकाणी जाऊन दुसऱ्या नावाने वास्तव्य करत असल्याचे आजपर्यंत अनेक कारवाईवरून समोर आले आहे.
अनेकांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या अनेक वर्षांपासून वाँटेड असणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जातो. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाँटेड असणाऱ्या अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत.
२०२४ चे आकडे काय सांगतात ?सन २०२४ ची आकडेवारी लक्षात घेतल्यास जिल्हात ३५३ मोस्ट वाँटेड असल्याची नोंद आहे. या वांटेडचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे. काही जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींची कुंडली कळते एका क्लिकवर
- आता प्रत्येक कारभार ऑनलाइन झाला आहे. एखाद्या गुन्हेगाराचे नाव टाकताच त्याच्यावर किती आणि कोणत्या प्रकारचे गुन्हे आहेत, याची माहिती एका क्लिकवर मिळत आहे.
- चंद्रपूरचा सीसीटीएनएस विभाग गुन्हेगारांची कुंडली अपडेट ठेवण्यात राज्यात अग्रेसर आहे. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेतही कुख्यात गुन्हेगारांची नोंद ठेवली जात आहे.
दोन वर्षांपासून फरार पोलिस विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील बहुतांश वाँटेड दोन ते तीन वर्षापासून फरार असून, पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, ते पोलिसांना गुंगारा देत आहे.
मागील वर्षात गुन्हेगार वाढले मागील वर्षभरात काही वाँटेड गुन्हेगार वाढले आहेत. त्यांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास घेत आहे. परंतु, ते वाँटेड पोलिसांना भेटतच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांची मोठी दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.