३१ धार्मिक स्थळे अनधिकृत
By Admin | Updated: February 26, 2016 00:58 IST2016-02-26T00:58:35+5:302016-02-26T00:58:35+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने २००९ नंतर बांधण्यात आलेले सर्व धार्मिक स्थळे अवैध ठरविली आहेत.

३१ धार्मिक स्थळे अनधिकृत
व्यवस्थापकांना बजाविली नोटीस : महानगरपालिका करणार निष्कासनाची कार्यवाही
चंद्रपूर : मुंबई उच्च न्यायालयाने २००९ नंतर बांधण्यात आलेले सर्व धार्मिक स्थळे अवैध ठरविली आहेत. अवैध धार्मिक स्थळांवर मे २०१६ पर्यंत कारवाई करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार चंद्रपूर शहरात ३१ धार्मिक स्थळे ही २९ सप्टेंबर २००९ नंतरची आढळली असून ती अनधिकृत असल्याचे महानगर पालिका प्रशासनाने म्हटले आहे. याबाबत पालिकेने व्यवस्थापकांना नोटीस बजावून धार्मिक स्थळ निष्काशीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चंद्रपूर शहर महानगर पालिकेने अनाधिकृत धार्मिक स्थळांवर कार्यवाही करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या धार्मिक स्थळांवर निष्काशनाची कार्यवाही करण्यात येणार आहे. महानगर पालिकेने २४ फेब्रुवारीला काढलेल्या पत्रकानुसार चंद्रपूर शहराच्या हद्दीत ३१ धार्मिक स्थळे अवैध असल्याचे म्हटले आहे. या धार्मिक स्थळांना नोटीस बजाविण्यात आले असून ही धार्मिक स्थळे २९ सप्टेंबर २००९ पूर्वीचे असल्यास २५ फेब्रुवारीपर्यंत आयुक्तांकडे पुरावे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अनेक वॉर्डात रस्त्याच्या कडेला धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. यामुळे विकासकामांत अडथळे निर्माण होत असून वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने २००९ नंतर तयार करण्यात आलेले सर्व धार्मिक स्थळे हटविण्यात यावी, असे निर्देश राज्य सरकारला दिले होते. राज्य सरकारने सर्व महानगरपालिकांना आपल्या हद्दीतील अवैध धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार चंद्रपूर मनपाने शहरातील अवैध धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून अहवाल तयार केला आहे. त्यात ३१ धार्मिक स्थळे अवैध आढळून आले. त्यामुळे व्यवस्थापकांना या धार्मिक स्थळांना हटविण्याबाबत नोटीस बजावल्या आहेत. तसेच धार्मिक स्थळे २००९ पूर्वीचे असल्याबाबतचा पुरावा २६ फेब्रुवारीला ४ वाजेपर्यंत सादर करावे व पुरावा नसल्यास ७ दिवसाच्या आत व्यवस्थापकानी स्वत: धार्मिक स्थळाचे निष्काशन करावे, अन्यथा मनपा प्रशासन कार्यवाही करून लागणारा खर्च कर वसुलीच्या रूपात व्यवस्थापकाकडून वसूल केला जाईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
अवैध असलेली धार्मिक स्थळे
माता मंदिर निर्माण नगर तुकूम, सत्वाचा मारोती मंदिर तुकूम, नाग मंदिर तुकूम, गणेश मंदिर पोष्ट कॉलनी तुकूम, माता मंदिर वैद्य नगर तुकूम, दुर्गा मंदिर अरविंदनगर चौक विवेकनगर, शिवनगर हनुमान मंदिर वडगाव, अमृतगंगा अपाटमेंट हनुमान मंदिर वडगाव, अमृतगंगा अपाटमेंट गणपती मंदिर वडगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह शिवनगर वडगाव, ताजुद्दीन बाबा नगर मंदिर मार्कंडऋषी महाकाली, महादेव लिंग तुळजाभवानी रोड तुळजाभवानी, गुरुमाऊली हनुमान मंदिर अंचलेश्वर वार्ड, माता मंदिर तुकूम, दुर्गा माता मंदिर जुमडे ले- आऊट नगिनाबाग, लुंबिनी बौद्ध विहार माता चौक मातानगर, सवारी बंगला २ नंबर क्वॉर्टर लालपेठ कॉलरी, जगदंबा मंदिर बाबुपेठ, बौद्ध विहार वैद्यनगर झोपडपट्टी तुकूम, प्रशिक बौद्ध विहार प्रज्ञा चौक नगिनाबाग, हनुमान मंदिर बगड खिडकी जवळ अंचलेश्वर वार्ड, शिवलिंग पिंड मंदिर इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागे मातानगर, नागमंदिर बगड खिडकी जवळ अंचलेश्वर वार्ड, फैजाने कंजुमल इमान मश्चिद ताडबन अंचलेश्वर वार्ड, सिद्धी विनायक मंदिर ओम नगर महाकाली, हनुमान मंदिर चंद्रशेखर आझाद चौक बाबुपेठ, शितलामाता मंदिर श्रीनगर लालपेठ कॉलरी, हनुमान मंदिर लालपेठ जुनी वस्ती तुळजाभवानी, बालाजी मंदिर देवस्थान विठ्ठल मंदिर, राधाकृष्ण मंदिर व हनुमान मंदिर तुकूम, हनुमान मंदिर बाबुपेठ या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.