चंद्रपूर मनपा करणार ३० हजार वृक्षारोपण
By Admin | Updated: July 1, 2017 00:39 IST2017-07-01T00:39:36+5:302017-07-01T00:39:36+5:30
राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केलेल्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होत ...

चंद्रपूर मनपा करणार ३० हजार वृक्षारोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केलेल्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होत यावर्षी चंद्रपूर महानगर पोलिकेतर्फे तब्बल ३० हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. २०१९ पर्यंत चंद्रपूर मनपा ६५ हजार वृक्षांचे रोपण करणार असल्याचे नियोजन आतापासून तयार आहे, असेही यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.
मनपाच्या तीन झोनपैकी झोन क्रमांक एकमध्ये नऊ हजार, झोन क्रमांक दोनमध्ये पाच हजार तर झोन क्रमांक तीन मध्ये सात हजार वृक्षरोपणाचे उद्दिष्ट्य ठरवून देण्यात आले आहेत. शहरात घटांगाडीद्वारे घरोघरी १४ हजार वृक्ष लागवडीसाठी वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. चंद्रपूर शहरात ही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, ते ठिकाणही निश्चित करण्यात आले आहेत. त्यात मनपा प्राथमिक शाळा परिसर, विविध प्रभागातील खुल्या जागा, मुख्य रस्त्यावर परिसरात, शहरातील स्मशानभूमी परिसर, कंपोस्ट डेपो बायपास रोड, शासकीय महाविद्यालय व खासगी शाळा आदींचा समावेश आहे. वृक्ष लागवड करण्याकरिता मनपाने विविध प्राजतीचे १८ हजार ९०० रोपटे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तसेच नागरिकांना घंटागाडीद्वारे वाटप करण्याकरिता विविध प्रकारचे रोपे उपलब्ध करण्यात आलेले आहे. स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपमहापौर वसंता देशमुख, झोन सभापती आशा आबोजवार, देवानंद वाढई आदी उपस्थित होते.