चंद्रपूरातील २८५ उमेदवारांना अखेर मिळणार शासकीय नोकरी ! 'अशी' आहेत नोकरीची पदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:55 IST2025-10-04T18:53:31+5:302025-10-04T18:55:06+5:30
Chandrapur : जिल्ह्यातील अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा प्रश्न न सुटल्याने संबंधित कुटुंबांची अनेक वर्षापासून प्रतीक्षा सुरू होती. अशा पात्र कुटुंबांतील व्यक्तीला नोकरीत सामावून घेण्याचा विषय राज्य शासनाने १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत समावेश केला. अंमलबजावनीने कुटुंबांना न्याय मिळाला आहे.

285 candidates from Chandrapur will finally get government jobs! These are the job posts
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा तिढा कायम होता. राज्य शासनाने १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपाधारकांचाही समावेश केल्याने जिल्ह्यातील २०२ अनुकंपाधारक आणि ८३ सरळसेवा भरती उमेदवार, अशा एकूण २८५ जणांची शासकीय नोकरीसाठी निवड झाली. राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते शनिवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात संबंधित उमेदवारांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा प्रश्न न सुटल्याने संबंधित कुटुंबांची अनेक वर्षापासून प्रतीक्षा सुरू होती. अशा पात्र कुटुंबांतील व्यक्तीला नोकरीत सामावून घेण्याचा विषय राज्य शासनाने १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत समावेश केला. अंमलबजावनीने कुटुंबांना न्याय मिळाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाची तत्परता
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आणि अधीक्षक नरेश बहिरम यांच्या मार्गदर्शनात ३ सप्टेंबर २०२५ रोजी अनुकंपाधारकांचा मेळावा आणि १३ सप्टेंबर २०२५ रोजी सरळसेवा अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. यात उपलब्ध पदे, शैक्षणिक अर्हता, पात्रता, वेतनश्रेणी, कामाचे स्वरूप, पदोन्नती संधी, विशेष प्रावीण्य, तंत्रज्ञ, शासकीय सेवेची जबाबदारी व कर्तव्य आदी माहिती दिली. या समुपदेशनाने शासकीय नोकरीत नवनियुक्त उमेदवारांचे मनोबल उंचावण्यास मदत झाली.
..अशी आहेत नोकरीची पदे
अनुकंपा तत्त्वावरील गट ३ आणि गट ४ च्या २०२ उमेदवारांना तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या लिपीक-टंकलेखक (गट-३) च्या ८३ उमेदवारांना असे एकूण २८५ जणांना शासकीय नोकरीची नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात येणार आहे. अनुकंपाधारक उमेदवारांमध्ये राज्य शासनाच्या गट - 'क'चे ५९, गट 'ड' चे ६९ (दोन्ही मिळून १२८ उमेदवार), जि. प. ग्रामविकास विभागाच्या वतीने गट-'क'चे २१, गट-'ड'चे २६ (४७ उमेदवार), नगर विकास विभाग, मनपा, नगर परिषद वतीने गट- 'क'चे १२, गट- 'ड'चे १५ (२७ उमेदवार) असे २०२ अनुकंपाधारक तर सरळ सेवा भरतीद्वारे लिपीक - टंकलेखकपदी नियुक्ती ८३ उमेदवार अशा एकूण २८५ जणांचा समावेश आहे.