नागभीड तालुक्यात दारूविक्री प्रकरणी २०८ जणांना अटक
By Admin | Updated: September 2, 2015 00:52 IST2015-09-02T00:52:03+5:302015-09-02T00:52:03+5:30
१ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली.

नागभीड तालुक्यात दारूविक्री प्रकरणी २०८ जणांना अटक
पाच महिन्यातील कारवाई : २४ लाखांची दारू जप्त
नागभीड : १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली. दारूबंदीच्या पाच महिन्यात २४ लाख २१ हजार ५४० रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू नागभीड तालुक्यात जप्त करण्यात आली असून या प्रकरणी २०८ आरोपींना अटक करण्यात आली.
नागभीड तालुक्याला भंडारा जिल्ह्याची सीमा लागून आहे, तर नागपूर जिल्ह्याचीही सीमा फार लांब नाही. त्यामुळे येथे दारूच्या अवैध वाहतुकीला उधाण येईल, अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने या तालुक्यात कानपा, बाम्हणी आणि चांदी चन्नोडा या गावाजवळ पोलीस चौक्या बसविण्यात आल्या होत्या. पण या चौक्यांच्या डोळ्यात धुळ झोकूण अवैध दारूची तस्करी करण्यात आली. हे नागभीड पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या संख्येवरुन व अटक केलेल्या आरोपींवरुन स्पष्ट होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात एकूण २२ केसेस करण्यात आल्या आणि २८ आरोपींना अटक करण्यात आली. या महिन्यात ३० हजार ८२५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मे महिन्यात ५५ केसेस झाल्या आणि ५९ आरोपींना अटक करण्यात आली. चार लाख ६७ हजार ३७० रुपयाचा मुद्देमाल तर एक टाटा सुमो वाहन जप्त करण्यात आले.
जून महिन्यात ३० केसेस करण्यात आल्या. चार लाख ६३ हजार ३५० रुपयाचा माल जप्त करून २५ आरोपींना अटक करण्यात आली आणि एका स्विफ्ट कारसह अन्य दोन वाहने जप्त करण्यात आली. जुलै महिन्यात ३८ केसेस झाल्या. या महिन्यात ५१ आरोपींना अटक करण्यात आली आणि सहा लाख ८० हजार ७२० रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
या महिन्यातील कारवाईत झायलो, ओमणी, नॅनो या वाहणांसह अन्य तीन वाहणे जप्त करण्यात आली. आॅगष्ट महिन्यात २६ आॅगस्टपर्यंत ३४ केसेस दाखल झाल्या असून ४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर सात लाख ७९ हजार २७५ रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती नागभीड पोलिसांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)