वर्षभरात २०४ जणांना डेंग्यूचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:02+5:302021-02-05T07:43:02+5:30

चंद्रपूर : कोरोनाच्या संकट घोगावत असतानाच जिल्ह्यातील २०४ जणांना डेंग्यूचा डंख झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मागील ...

204 people get dengue stings during the year | वर्षभरात २०४ जणांना डेंग्यूचा डंख

वर्षभरात २०४ जणांना डेंग्यूचा डंख

चंद्रपूर : कोरोनाच्या संकट घोगावत असतानाच जिल्ह्यातील २०४ जणांना डेंग्यूचा डंख झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या आकडेवारीत घसरण झाली असून, डेंग्यू मृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.

डेंग्यू हा एडीस या डासापासून होतो. डेंग्यू तापाकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. गृहभेटीच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सूचना देण्यात येत आहेत, तसेच जिल्ह्यात कोरोना शिरकाव झाल्यानंतर मनपा प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासन आदीच्या माध्यमातून स्वच्छता पाळली जात आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचा आलेख घसरला आहे. सन २०१९ मध्ये जिल्ह्यात १,३३८ जणांच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४६५ नमुने पॅाझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर सन २०२० मध्ये हे प्रमाण निम्म्यावर आले असून, ९३१ नमुन्यांपैकी २०४ रुग्ण आढळून आले, परंतु आरोग्य विभागाच्या योग्य व वेळीच उपचाराने सर्वांना बरे करण्यात यश आले आहे.

बॉक्स

डेंग्यूची लक्षणे

१, तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी

२. गोवरासारखे अंगावर पुरळ येणे, झटके येणे,

३. डोळ्यांच्या आतील भागात दुखणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे,

४. डोळ्यातून व नाकातून पाणी गळणे, रक्तदाब कमी होणे, थंड पडणे, बेशुद्धावस्था होणे

बाॅक्स

जिल्ह्यात प्रत्येक मंगळवारी कोरडा दिवस

डेंग्यू टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंगळवारी कोरडा दिवस पाळण्यात येत आहे. आरोग्य विभागातंर्गत हिवताप विभागाचे कर्मचारी, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका गृहभेटी देऊन कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करीत आहेत. यासोबतच संदिग्ध रुग्ण आढळल्यास त्याचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जाते. तो रुग्ण आढळून आल्यास गावातील संशयिताचे नमुने घेऊन उपचार करण्यात येते.

कोट

डेंग्यूचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात वाढतो. सूर्योदय व सूर्यास्ताच्या पूर्वी हा डास आढळून येतो. त्यामुळे आपल्या घराच्या भोवती पाणी साचू देऊ नये, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. लक्षणे आढळल्यास तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्यांनी औषधोपचार घ्यावा.

- डाॅ. प्रतीक बोरकर,

जिल्हा हिवताप अधिकारी

Web Title: 204 people get dengue stings during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.