१७ दिवसांत डेंग्यूचे तब्बल १९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:59 IST2018-08-29T22:58:52+5:302018-08-29T22:59:24+5:30
वातावरणातील बदल व अस्वच्छतेमुळे जिल्ह्यात विविध आजाराने डोके वर काढले आहे. मागील १७ दिवसांत जिल्ह्यात १९ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्व रुग्णांवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून सद्यस्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती सुव्यवस्थित असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

१७ दिवसांत डेंग्यूचे तब्बल १९ रुग्ण
परिमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वातावरणातील बदल व अस्वच्छतेमुळे जिल्ह्यात विविध आजाराने डोके वर काढले आहे. मागील १७ दिवसांत जिल्ह्यात १९ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्व रुग्णांवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून सद्यस्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती सुव्यवस्थित असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस, सर्वत्र साचणारे पाणी, त्यामुळे मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे. दिवसा ऊन- पाऊस व सायंकाळी दमट वातावरणामुळे व्हायरल फ्ल्यूचा प्रकोप वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात मलेरिया, टायफाईड, सर्दी खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मागील १२ ते २८ आॅगस्ट या १७ दिवसांच्या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये १९ डेंग्यूचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून सद्यस्थितीत सर्वांची प्रकृती ुचांगली असल्याचे रूग्णालयाने कळविले आहे.
चंद्रपूर शहरात आढळले नऊ रुग्ण
चंद्रपूर शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याचा मनपातर्फे गाजावाजा केला जात आहे. मात्र शहराच्या विविध वॉर्डांतील अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. जटपुरा गेट, बिनबा गेट, बंगाली कॅम्प, शिवाजी नगर, पठाणपुरा, बाबूपेठ, रहेमतनगर, तुकूम, आदी वॉर्डातील नऊ व्यक्ती डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने प्रत्येक वॉर्डात आरोग्य शिबिर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली.
डेंग्यूने दोघांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी सावली येथे एकाच कुटुंबातील दोन रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले. यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. तर तालुक्यातील नवेगाव येथील दोघांचा मलेरियामुळे मृत्यू झाला. गोंडपिपरी तालुक्यातील सकनूर येथील एका रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाला. याबाबत गावांमध्ये उपाययोजना करण्याची मागणी आहे.
ही आहेत डेंग्यूची लक्षणे
पाण्याचे डबके तयार झाल्यास त्यामध्ये ‘एडीस’ नावाची मादी अंडी घालते. यातूनच जीवघेण्या डासांची उत्पती होते. हा डास चावल्यानंतर सुरूवातीला तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोकेदुखी सुरू होते. डोळ्याच्या मागे खास सुजते. त्यानंतर अंगावर लालसर पुरळ येतात. बरेचदा कान नाकातून रक्तस्त्राव होतो. नागरिकांना अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालय अथवा आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.
औषधांचा तुटवडा
जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांना बाहेरील मेडिकल दुकानातून औषधांची खरेदी करावी लागत आहे. तर अनेक रुग्णालयात डेंग्यू कीट उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी परीक्षण केंद्रातून डेंग्यूची तपासणी करावी लागत आहे. मात्र खासगी डॉक्टर तपासणीचे शुल्क मोठ्या प्रमाणात आकारत असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.