वस्ती १६ घरांची; संघर्ष २५ वर्षांचा !
By Admin | Updated: April 8, 2016 00:51 IST2016-04-08T00:51:45+5:302016-04-08T00:51:45+5:30
गाव आहे पण दळणवळणाला डांबरी रस्ते नाही. विजेचे खांब आहे; पण गावात वीज नाही. माईस कंपनी पाणी पुरवठा करीत असले तरी दगदगही तेवढीच आहे.

वस्ती १६ घरांची; संघर्ष २५ वर्षांचा !
गावात शाळाच नाही : कोलामबांधव मुलभूत गरजांपासूनही वंचित
शंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे जिवती
गाव आहे पण दळणवळणाला डांबरी रस्ते नाही. विजेचे खांब आहे; पण गावात वीज नाही. माईस कंपनी पाणी पुरवठा करीत असले तरी दगदगही तेवढीच आहे. गावात शाळा नाही. अंगणवाडी नाही, अशी विदारक स्थिती स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतमधील पाटागुडा येथील कोलाम बांधव अनुभवत आहेत.लोकमत चमूने या गावाला भेट दिली असता १६ घरांचे हे गाव मागील २५ वर्षांपासून मुलभूत गरजांसाठी प्राणांतिक संघर्ष करीत असल्याचे दिसून आले.
उपेक्षित अशा या पाटागुडा कोलाम वस्तीची कहाणीही मोठी केवीलवाणी आहे. येथील लोकांना निवाऱ्याची सोय व्हावी, यासाठी ११ घरकूल मंजूर झाले. त्यापैकी १० घरकुलांचे कामही होत आले. मात्र त्याच घरावर काम करणाऱ्या कोलाम बांधवाना मजुरी मिळाली नसल्याचे बोंब सुरु असून घरकुल बांधकामात आवश्यक साहित्य पाहिजे त्या प्रमाणात वापरले नसल्याचे गावकरी सांगतात. मनकापूर (पंडीतगुडा) गावापासून तीन किमी अंतरावरील कच्च्या रस्त्यावर पाटागुडा हे १६ घरांची वस्ती असलेले कोलामांचे गाव आहे. जेमतेम ६० लोकसंख्या असलेल्या गुड्यात संपूर्ण दारिद्र्य रेषेखालील कुटुंब वास्तव्यास आहे. गावात शाळा नसल्याने कुणालाही शिक्षण घेता आले नाही. आजही हे कोलाम बांधव शिक्षणापासून वंचित आहेत. अंगणवाडी इमारत नाही. अंगणवाडी नाही, पाण्याची टाकी बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षापूर्वी खड्डा खोदला.
पण त्याचे बांधकाम आजही झाले नसून तो खड्डा कोलामांसाठी धोकादायक ठरत आहे. त्याच प्रमाणे चार वर्षापूर्वी गावातील मारु भिमु सिडाम यांना शासनाने घरकूल दिले. त्याचा पायवाही बांधला.
परंतु अनुदानाचा पहिला हप्ताही दिला नाही व ग्रामपंचायतीने त्यांच्या घरकुलाचे कामही केले नाही. रेती, दगड, विटा, आजही साक्षीला पडले आहेत.
नियमित राशन मिळत नाही
प्रत्येक व्यक्तीला पाच किलो राशन दरमहा शासनाकडून मिळत असले तरी पाटागुडा येथील कोलाम बांधवांना नियमित स्वस्त धान्य तर मिळत नाहीच, पण धान्य मिळाले तरी जनकापूर (पेडीतगुडा) या गावावरुन तीन किमी अंतर पायी चालत जाऊन आणावे लागत असल्याची ओरड पाटागुडा येथील आयु सिडाम, मुत्ता सिडाम, रामू सिडाम, देवराव आत्राम, राजू आत्राम, माधु सिडाम यांनी लोकमतजवळ व्यक्त केली.
पाटागुडा गावात निसर्गाचे पाणी अडवून त्या ठिकाणी बोअरवेल मारुन पाण्याची सोय करुन देण्यासाठी त्या ठिकाणी खड्डा खोदला होता. पण ती योजनाच बंद झाल्याने ते काम झाले नाही. त्याच प्रमाणे विजेची सोय व्हावी म्हणून गावात खांब उभे केले. वायरींग झाली पण एकही मीटर नसल्याच्या कारणावरुन विद्युत विभाग वीज पुरवठा करीत नाही.
- सीताराम मडावी, सरपंच ग्रा.पं. पाटण
लसीकरणालाच शिजते अंगणवाडीची खिचडी
गावात कुठले लसीकरण करायचे असल्यावरच यंत्रणेला जाग येते. आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका गावात येतात व गावातील मुले जमा करण्यासाठी त्याच दिवशी खिचडी शिजवितात. असा संतापजनक प्रकार गावकऱ्यांशी बोलल्यावर समोर आला.० ते ६ वयोगटातील बालकांना नियमित पोषण आहार मिळावा, त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, त्यांना शाळेत जाण्याची सवय लागावी. सोबतच कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, हे शासनाचे मुळ उद्देश आहेत. पण गावात अंगणवाडीही नाही आणि खिचडीही शिजत नाही. मग शासनाचे उद्देश साध्य होईल का, यावर आरोग्य विभागाने चिंतन करण्याची गरज आहे.