शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:08+5:302021-03-29T04:16:08+5:30
चंद्रपूर : नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण १५ ...

शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र
चंद्रपूर : नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण १५ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली असून, त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकप्रकरणी एक लाख रुपये सानुग्रह मदत त्वरित देण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.
जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्येची प्रकरणे तपासणी समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. याअंतर्गत एकूण २३ प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यापैकी १५ प्रकरणे पात्र, पाच अपात्र, तर दोन प्रकरणांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. बैठकीला पोलीस विभाग, आरोग्य व कृषी विभागाचे, तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा अग्रणी बँक व कृषी विकास अधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
बॉक्स
ही आहेत पात्र प्रकरणे
पात्र प्रकरणात कोरपना तालुक्यातील निमणी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी मंगेश तिखट, कोठोडा बु. येथील मोतीराम तोडासे, राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील प्रभाकर वैद्य, विरूर स्टे. येथील गुलाब गोहणे व सुरेश दोरखंडे, पाचगाव येथील शंकर बोरकुटे, टेकामांडवा येथील विक्रम सोडनर, नागभीड तालुक्यातील मोहाडी येथील बळीराम शेंडे, चंद्रपूर तालुक्यातील दाताळा येथील महादेव येलमुले, ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथील जीवन उंदीरवाडे व जगन्नाथ राऊत, गणेशपूर येथील अनिल गुरनुले, सौन्द्री येथील नंदकिशोर राऊत, चिंचोली बुज. येथील नामदेव ढोरे, वरोरा तालुक्यातील राजू जेऊरकर यांच्या प्रकरणांचा समावेश आहे.