जिल्हा महिला रुग्णालयात १३१ कोविड बेड उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:39+5:302021-04-26T04:25:39+5:30
चंद्रपूर : जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी नव्याने ४४ बेड कार्यान्वित करण्यात आले असून सोमवारी अधिक ११ बेड सुरू ...

जिल्हा महिला रुग्णालयात १३१ कोविड बेड उपलब्ध
चंद्रपूर : जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी नव्याने ४४ बेड कार्यान्वित करण्यात आले असून सोमवारी अधिक ११ बेड सुरू करण्यात येत असल्याने आता तेथे एकूण १३१ बेड उपलब्ध झाले आहेत. यात ४५ बेड आयसीयुचे तर १० जनरल बेड असून उर्वरित सर्व ७६ ऑक्सिजन बेड आहेत. याशिवाय लवकरच येथे २०० नवीन बेड कार्यान्वित करण्यात येणार असून त्यातील १०० बेड येत्या आठवडाभरातच उपलब्ध होणार आहेत.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी शनिवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील सी-विंगमधील ॲनाटॉमी, बायोकेमेस्ट्री, पीएसएम, पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी यासह इतर प्रशासकीय विभाग तातडीने दुसऱ्या इमारतीत स्थलांतरित करून कोविड रूग्णांसाठी जागा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. या रिक्त होणाऱ्या जागेत २०० ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या ठिकाणी २० किलो लीटरची लिक्विड ऑक्सिजन टँक देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. स्त्री रूग्णालयात कोविड बेड उपलब्ध करण्याचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी विविध विभागात भेट देत उपलब्ध आरोग्य सोयी-सुविधांची पाहणी केली. तसेच कोविड वार्डला भेट देऊन उपलब्ध औषधसाठा, सेवा देणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीची माहिती जाणून घेतली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. बंडू रामटेके आदी उपस्थित होते.