निवडणुकीसाठी ११ हजार ३१९ कर्मचारी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST2021-01-14T04:23:04+5:302021-01-14T04:23:04+5:30
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्ह्यातील ...

निवडणुकीसाठी ११ हजार ३१९ कर्मचारी सज्ज
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल ११ हजार ३१९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही निवडणूक कामाला लावण्यात आले आहे. दरम्यान, ११ हजार ३६४ उमेदवारांचे नावे ईव्हीएममध्ये टाकण्यात आली आहेत.
कोरोना संकटामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक झाली नाही. त्यामुळे राज्य निवडणूक विभागाने राज्यभरातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ६२९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती. मात्र २० ग्रामपंचायती अविरोध तर एक ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रुपांतर झाल्याने आता ६०८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने संपूर्ण तयारी केली आहे यासाठी आरओ तसेच मतदानपथक असे एकूण ११ हजार ३१९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जिल्हाधिकारी आणि प्रत्येक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची प्रभागनिहाय वेगवेगळ्या प्रभागासाठी पांढरी, गुलाबी तसेच पिवळी अशा रंगाच्या पत्रिका असून त्या ईव्हीएममध्ये फिट करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय निवडणूक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संबंधित उमेदवारांच्या नावाची यादी तयार करून सील केली आहे. गुरुवारी सकाळपासून संबंधित कर्मचाऱ्यांना ईव्हीएम तसेच अन्य साहित्य वितरित करण्यात येणार आहे. दिवसभर तालुकास्तरावर हे काम सुरू राहणार आहे.