११ पंचायत समितीवर महिलाराज
By Admin | Updated: September 14, 2014 23:59 IST2014-09-14T23:59:21+5:302014-09-14T23:59:21+5:30
रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीमध्ये १५ पंचायत समितीपैकी तब्बल ११ पंचायत समितीमध्ये महिलांनी सत्ता मिळविली. यात ८ पंचायत समितीमध्ये काँग्रेस,

११ पंचायत समितीवर महिलाराज
आठ ठिकाणी काँंग्रेसचा झेंडा : भाजपा तीन, राष्ट्रवादी दोन, युवाशक्ती, शेतकरी संघटनेकडे प्रत्येकी एक पंचायत समिती
चंद्रपूर : रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीमध्ये १५ पंचायत समितीपैकी तब्बल ११ पंचायत समितीमध्ये महिलांनी सत्ता मिळविली. यात ८ पंचायत समितीमध्ये काँग्रेस, भाजपा तीन, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन तर, युवाशक्ती संघटना आणि शेतकरी संघटनेने प्रत्येकी एका पंचायत समितीवर सत्ता मिळविली आहे. चंद्रपूर पंचायत समितीमध्ये मागील साडेबारा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला यावर्षी सत्ताबाहेर पडावे लागले. चंद्रपूर, राजूरा, सिंदेवाही, नागभीड, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल, गोंडपिपरी पंचायत समितीमध्ये काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. बल्लारपूर, पोंभूर्णा, भद्रावतीमध्ये भाजप, जिवती तसेच सावली पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी, कोरपना पंचायत समितीमध्ये शेतकरी संघटना आणि चिमूरमध्ये युवाशक्ती संघटनेने आपला झेंडा रोवला आहे.
चंद्रपूर- येथील पंचायत समितीमध्ये मागील साडेसात वर्षापासून पंचायत समितीमध्ये सत्ता असलेल्या भाजपला यावेळी सत्तेबाहेर पडावे लागले. १२ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये सभापतीपदी रोशन पचारे यांची निवड करण्यात आली. तर, उपसभापतीपदी दुसऱ्यांदा गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे मनोज धर्मराव आत्राम विजयी झाले. कांँग्रेसला ६ भाजपाला ४ मते मिळाली. भाजपाच्या सदस्य सविता नवले, गोपिका दळांजे यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. १२ सदस्य असलेल्या चंद्रपूर पंचायत समितीमध्ये मागील साडेसात वर्षांपासून भाजपची सत्ता होती. अडीच वर्षापूर्वी भाजपचे सहा तसेच एक अपक्ष असे मिळून पंचायत समितीवर सत्ता मिळविली. मात्र रविवारी पार पडललेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४, राष्ट्रवादी १, अपक्ष एक असे सहा सदस्य मिळून पंचायत समितीवर काँग्रेसने झेंडा फडकविला. काँग्रेसचे रोशन पचारे यांनी भाजपचे बंडू माकोडे तर, उपसभापतीपदी मनोज आत्राम यांनी बकुवाले यांना पराभूत केले.
बल्लारपूर- पंचायत समिती सभापतीपद नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलासाठी राखीव होते. सभापतीपदासाठी भाजपाच्या चंद्रकला नरेंद्र बोबाटे यांनी एकमेव अर्ज सादर केला. त्यांची अविरोध निवड करण्यात आली. तर, उपसभापतीपदासाठी विद्यमान उपसभापती भाजपाच्या सुमन लोहे यांनी तर, काँग्रेसकडून अनेकश्वर मेश्राम यांनी अर्ज सादर केला. दोघांनाही सारखे मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात काँग्रेसचे अनेकश्वर मेश्राम यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
राजुरा- आठ सदस्यीय पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या निर्मला कुळमेथे अविरोध निवडून आल्या. येथील सभापती पद अनुसुूचित जमातीसाठी राखीव होते. पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे तीन, शेतकरी संघटना चार, शिवसेना एक अशी सदस्य संख्या आहे. उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. यात शेतकरी संघटनेच्या चंद्रकला ढवस यांच्या विरोधात काँग्रेसचे अब्दूल जमिर अब्दूल हमिद उभे होते. ढवस तसेच हमिद यांना प्र्रत्येकी चार मते पडल्याने ईश्वरचिठ्ठीने उपसभापतीची निवड करण्यात आली. यात चंद्रकला ढवस विजयी झाल्या.
सिंदेवाही- आठ सदस्य संख्या असलेल्या सिंदेवाही पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे ५ तसेच भाजपाचे तीन सदस्य आहे. पार पडलेल्या सभापती-उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रुपा सुरपान यांचा विजय झाला. काँग्रेसकडून रुपा सुरपाम तर, भाजपाकडून लता डोंगरवार निवडणूक रिंंगणात होत्या. सुरपाम यांना पाच तर, डोंगरवार यांना तीन मते मिळाली. उपसभापती पदासाठी कांँग्रेसचे रमाकांत लोधे यांना पाच, भाजपाच्या लता डोंगरवार यांना तीन मते मिळाली. या पंचायत समितीमध्ये कांँग्रेसने सत्ता मिळविली आहे.
देवाडा- पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे बापू चिंचोलकर सभापतीपदी तर, महेश रणदिवे यांची उपसभापतीपदी अविरोध निवड झाली.
चार सदस्यीय पंचायत समितीमध्ये सभापतीपदी यापूर्वी अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षण असल्याने भाजपाच्या भारती कन्नाके सभापतीपदी होत्या. आता ओबीसी(नामाप्र) चे आरक्षण असल्याने भाजपाचे बापू चिंचोलकर यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. चिंचोलकर यांचा सभापती पदासाठी तसेच उपसभापतीपदासाठी रणदिवे यांनीच अर्ज भरल्यामुळे येथील निवडणूक अविरोध झाली.