राजुऱ्यात साकारणार १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय
By Admin | Updated: September 3, 2014 23:15 IST2014-09-03T23:15:43+5:302014-09-03T23:15:43+5:30
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात अनेक उद्योगही आहेत. त्यामुळे येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णाललय निर्माण व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. आमदार सुभाष धोटे

राजुऱ्यात साकारणार १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय
दिलासा : सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात अनेक उद्योगही आहेत. त्यामुळे येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णाललय निर्माण व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. आमदार सुभाष धोटे यांनी या मागणीचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी प्राप्त करून घेतली होती. ८ कोटी ४३ लाख ४६ हजार एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी आठ कोटी ४३ लाख ४६ हजार एवढ्या रकमेच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे लवकरच १०० खाटांचे हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणाऱ्या आठ कोटी रुपयांच्या आर्थिक प्रस्तावास मान्यता दिल्याचे आरोग्य सेवा संचालनालयाचे १४ जानेवारी २०१४ रोजी निर्गमीत करण्यात आलेले पत्र नुकतेच २ सप्टेंबर २०१४ रोजी प्राप्त झाले असून लवकरच राजुरा येथे या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. सदर उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे खेचून आणल्यात आमदार सुभाष धोटे यांनी शासन दरबारी पुर्ण ताकद लावली होती. त्यामुळेच १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे साकार होत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्र अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असून या क्षेत्रात एकही १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय नव्हते या उपजिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीमुळे संबंधित कोरपना व जिवती तालुक्यातील रुग्णांनाही या उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ मिळणार आहे. तसेच सीमेलगतच्या तेलंगाना राज्यातील अनेक गावातील अनेक रुग्ण थेट चंद्रपूरला उपचारासाठी जात असतात. त्यांंनाही आता राजुरा येथे उपचार घेण्याची संधी या रुग्णालयामुळे मिळणार आहे.
राजुरा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्हावे, अशी या परिसरातील नगारिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यामुळे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळावा, छोट्या छोट्या व्याधीसाठी चंद्रपूरला जावे लागु नये, या बाबीचा विचार करुन आमदार सुभाष धोटे यांनी हा ज्वलंत प्रश्न शासनाकडे लावून धरला होता व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. (नगर प्रतिनिधी)