विद्यार्थ्यांसाठी 'डिझाइन' हे आकर्षक करिअर, भारतात मोठी गरज; संधी अन् वेतन किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 01:40 PM2022-06-15T13:40:50+5:302022-06-15T13:41:16+5:30

गेल्या पाच वर्षांत, "डिझाइन" हे भारतातले एक झपाट्याने प्रगती करणारे करिअर म्हणून नावारूपास आले आहे.

Design is an attractive career for students a great need in India How Much Opportunity know it here | विद्यार्थ्यांसाठी 'डिझाइन' हे आकर्षक करिअर, भारतात मोठी गरज; संधी अन् वेतन किती?

विद्यार्थ्यांसाठी 'डिझाइन' हे आकर्षक करिअर, भारतात मोठी गरज; संधी अन् वेतन किती?

चिरंजीत रेगे, संचालक, सिलिका

भारतामध्ये 14 ते 18 वर्षे वयोगटातले अंदाजे 8% -10% विद्यार्थी व्यवसाय म्हणून डिझाइन हा पर्याय निवडण्याचा विचार करतात. गेल्या पाच वर्षांत, "डिझाइन" हे भारतातले एक झपाट्याने प्रगती करणारे करिअर म्हणून नावारूपास आले आहे. गेल्या दशकात, विद्यार्थी व पालक यांचा डिझाइन क्षेत्राकडचा कल कमालीचा वाढला आहे. शैक्षणिक बाबतीत योग्य निर्णय घेतला तर चांगली नोकरी नक्की मिळते, असे अम्हाला वाटते. याचा अर्थ, योग्य प्रोफेशनचा पर्याय = आवड + व्यक्तिमत्त्व + कल + संधी. विद्यार्थी व पालक यांच्या फायद्यासाठी डिझाइनचे शिक्षण व करिअरच्या संधी यासंबंधीची वास्तव माहिती त्यांना सांगणे अतिशय महत्त्वाचे आहे.

‘डिझाइन’ समजून घेणे
उत्सुकता, निर्मितीची इच्छा व प्रश्न सोडवण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनी डिझाइनमध्ये करिअर करण्याचा विचार करावा. व्यक्तींच्या समस्या ओळखणे व सोडवणे हा डिझाइनचा गाभा आहे. डिझाइन करत असताना युजर हा समस्येच्या उपायाच्या केंद्रस्थानी असतो. हे व्यापक क्षेत्र आपण कुठे राहतो, काय कपडे वापरतो, कोणती वाहने चालवतो, काय मनोरंजन पाहतो व आपण कोणती अॅप वापरतो, अशा आपल्या आयुष्याच्या सर्व पैलूंना स्पर्श करते. या सर्व बाबतीत डिझाइन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. व्यक्तींचे प्रश्न जाणण्यामध्ये व सोडवण्यामध्ये डिझाइन केंद्रस्थानी आहे. त्यामध्ये संवाद व मनोरंजनाच्या दृष्टीने ग्राफिक तयार करणे, व्हिज्युअल इफेक्ट देणे, आणि हलते चित्र तयार करणे यांचाही समावेश असतो.

कल व आवड असणे गरजेचे
डिझाइनमध्ये यशस्वी करिअर करण्यासाठी एक उत्तम आर्टिस्ट असणे पुरेसे असते, हे गैरसमज सर्रास दिसून येतो. आणखी एक गैरसमज म्हणजे, डिझाइन हे गोष्टी कशा दिसतात याच्याशीच केवळ निगडित असते. वस्तू कशा दिसतात व वाटतात एवढ्यापुरते डिझाइन मर्यादित नसते; त्या कशा काम करतात तेही महत्त्वाचे असते. डिझाइनमध्ये जाण्यासाठी तुमचा कल त्याकडे असणे गरजेचे आहे, म्हणजे उपजत क्षमता व आवड, किंवा अन्य करिअर किंवा व्यवसायांविषयी असते तसे प्रेमही म्हणता येईल. डिझाइनरकडे केवळ कलात्मक व सौंदर्यात्मक क्षमता असून पुरत नाही, त्यांच्याकडे शास्त्रीय व तार्किक क्षमताही असाव्या लागतात, कारण डिझाइन म्हणजे "फॉर्म + फंक्शन" असते. समस्या ओळखण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी डिझाइनरमध्ये उत्सुकता, अनुभूती व समस्या सोडवण्याची कौशल्ये असणे आवश्यक आहे. डिझाइन हे करिअर म्हणून स्वीकारण्यापूर्वी, शासत्रीय, डिझाइन-प्रणित कलचाचणी करणे उपयुक्त ठरेल.

भारतात उपलब्ध असलेले डिझाइनचे शिक्षण
भारतात गेल्या दोन दशकांमध्ये, 150 हून अधिक सरकारी व खासगी डिझाइन संस्था सुरू झाल्या आहेत. एमआयटी, सृष्टी-मणिपाल, ओपी जिंदाल, एनएमआयएमएस, सोमय्या ट्रस्ट, डी. वाय. पाटील, अॅटलास, कर्णावती व अन्य अनेक महत्त्वाच्या खासगी शैक्षणिक संस्था बॅचलर्स (B.Des) व मास्टर्स (M.Des) स्तराचे डिझाइन अभ्यासक्रम चालवतात. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात मोजकीच डिझाइन स्कूल होती. डिझाइन शिक्षणातील प्रॅक्टिकल शिक्षणाचा पैलू विचारात घेता, डिझाइन स्कूल स्थापन करण्यासाठी प्रचंड पायाभूत सुविधांची गरज भासते. डिझाइन शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये सक्रिय गुंतवणूक करणारे सरकार व खासगी संस्थांमुळे देशातील डिझाइन क्षेत्राच्या भविष्याबाबत आशा निर्माण झाल्या आहेत.

आंतरशाखेय दृष्टिकोन व करिअरची दिशा
डिझाइन शिक्षण अन्य क्षेत्रांपेक्षा वेगळे असून ते आंतरशाखेय आहे. डिझाइनर एकाच वेळी निरनिराळ्या प्रकल्पांवर काम करू शकतो, जसे, प्रॉडक्ट डिझाइनर एक ग्राफिक डिझाइनर किंवा UX/UI डिझाइनर म्हणूनही काम करू शकतो. डिझाइनमध्ये युजर केंद्रित दृष्टिकोन" अवलंबला जात असल्याने कंपन्या महत्त्वाच्या व व्यवस्थापनाच्या नोकऱ्यांसाठी डिझाइनरची नियुक्ती करतात. डिझाइनरच्या आंतरशाखेय क्षमतेमुळे त्यांचे भविष्य सुरक्षित असते. त्यांना विविध शाखांमध्ये कार्यरत उद्योगांतील चढ व उतार हाताळणे शक्य होते.

इंडस्ट्रीअल डिझाइन, कम्युनिकेशन डिझाइन, फॅशन डिझाइन, आयटी / टेक डिझाइन, आर्किटेक्चर अँड फाइन, अप्लाइड आर्ट हे डिझाइनमध्ये उपलब्ध असलेल्या 50 हून अधिक स्पेशॅलिटींपैकी काही पर्याय आहेत. UX / UI डिझाइन, AR / VR डिझाइनर, सिस्टीम डिझाइन, स्ट्रॅटेजिक डिझाइन मॅनेजमेंट, गेम डिझाइन, टेक्नालॉजी प्रॉडक्ट डिझाइन, व्हीएफएक्स डिझाइन या व्यवसायांना मोठी मागणी आहे. डिझाइन हे कौशल्यांची आवश्यकता असलेले क्षेत्र असून, त्यामध्ये उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांबद्दल आणि त्यापैकी कोणता पर्याय आपल्या पाल्यासाठीय योग्य ठरेल याबद्दल लोकांना अजूनही फारशी माहिती नाही.  

कामाच्या संधी व वेतन
विद्यार्थ्यांना चार वर्षांच्या बॅचलर्स अभ्यासक्रमामध्ये किंवा अडीच वर्षांच्या मास्टर्स अभ्यासक्मामध्ये विविध प्रकल्प व इंटर्नशिप पूर्ण करावी लागते. या प्रकल्पांतून व इंटर्नशिपमधून त्यांना प्रत्यक्ष क्षेत्राचा अनुभव मिळतो व त्यातूनच नोकरीची संधीही मिळते. तंत्रज्ञान, कन्सल्टिंग, उत्पादन, फॅशन, ई-कॉमर्स, डिझाइन स्टुडिओ, जाहिरात एजन्सी, औद्योगिक उत्पादने, ग्राहक उत्पादने, ऑटोमोबाइल्स व गेमिंग या क्षेत्रांतील कंपन्या डिझाइनरची नियुक्ती करतात. डिझाइन स्कूल केवळ नोकरीसाठी इच्छुकांनाच नाही, तर उद्योजकांनाही प्रशिक्षण देतात.

प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण या स्वरूपाच्या शिक्षणामुळे डिझाइन प्रोफेशनल प्रत्यक्ष काम करण्यासाठी सज्ज झालेले असतात. डिझाइन थिंकिंग, नव्या पद्धतीने समस्या सोडवणे व या उद्योगासाठी उपयुक्त गुणवत्ता असणाऱ्यांसाठी कंपन्या अधिक पैसे देण्यास तयार असतात. पदवी घेतलेल्या नव्या डिझाइनरना दरवर्षी 6-8 लाख रुपये, तर पदव्युत्तर डिझाइनरना दरवर्षी 10-12 लाख रुपये मिळू शकतात. त्यांच्यापेक्षा इंजिनीअरिंग पदवीधर व पदव्युत्तर किमान 50% अधिक कमावतात. इतके चांगले वेतन पाहता डिझाइन शिक्षणाचा महागडा खर्च योग्य ठरतो. डिझाइन स्कूलची फी दरवर्षी 3 ते 6 लाख रुपये असते.

भारतात डिझाइनरची मोठी गरज
भारतामध्ये डिझाइनरच्या संख्येपेक्षा त्यांना असलेली मागणी अधिक आहे. एका अहवालानुसार, सर्व नोकऱ्यांमध्ये डिझाइनरचे प्रमाण लवकरच 1% असेल, अशी सीआयआयची अपेक्षा आहे. भारतात दरवर्षी जेमतेम 10,000 डिझाइनर व 20,000 आर्किटेक्ट तयार होतात. या तुलनेत, चीनमध्ये ही संख्या 3 लाख आहे व दक्षिण कोरियासारख्या लहान देशात दरवर्षी 25,000 नवे डिझाइनर तयार होतात. डिझाइनकडे कल व आवड असलेल्या विद्यार्थ्यांना शोधणे व त्यांच्या या आवडीचे रूपांतर करिअरमध्ये करण्याची प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जागतिक स्तरावर स्पर्धात्मकता, आर्थिक प्रगती, उत्पादन व ब्रँडची निर्मिती आणि उच्च राहणीमान यासाठी डिझाइनचे महत्त्व मोठे असल्याचे सरकार जाणते. सरकारने नवीन नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ डिझाइनची स्थापना केली आहे, सहा आयआयटींमध्ये डिझाइन अभ्यासक्रम सुरू केले आहेत आणि "मेक इन इंडिया" व "स्मार्ट सिटीज" असे महत्त्वाचे उपक्रम सादर केले आहेत. देशात डिझाइन शिक्षणाला व या व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने "इंडिया डिझाइन कौन्सिल"ची स्थापना केली आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था व उद्योग या सर्वांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

सारांश
डिझाइनमध्ये करिअर करायचे असेल तर तुम्ही आघाडीच्या डिझाइन स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे. तुमचा कल व आवड काय आहे, याचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर योग्य संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तयारी सुरू करा. या परीक्षांसाठी मार्गदर्शन करतील अशा संस्थांकडे कोर्स करणेही उपयुक्त ठरेल. B.Des व M.Des अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक डिझाइन संस्थेच्या स्वतःच्या प्रवेशपरीक्षा व प्रवेशाची ठरलेली प्रक्रिया आहे. B.Arch प्रवेशासाठी NATA व JEE पेपर 2 गरजेचे असतात, तर BFA प्रवेशासाठी MAH-AAC-CET गरजेची असते. या अवघड प्रवेशपरीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांची चाचणी घेतात, जसे कल्पकता, संवाद, क्रिटिकल थिंकिंग, निरीक्षण, व्हिज्युअलायझेशन, समस्या निवारण, सौंदर्याबाबत संवेदनशीलता व तार्किक क्षमता.

Web Title: Design is an attractive career for students a great need in India How Much Opportunity know it here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.