Class 10th (Complete Sanskrit) Papers | इयत्ता १०वी (पूर्ण संस्कृत) कृतिपत्रिका

इयत्ता १०वी (पूर्ण संस्कृत) कृतिपत्रिका

ठळक मुद्देइयत्ता १०वी (पूर्ण संस्कृत) कृतिपत्रिकाघटकनिहाय गुणविभागणी

इयत्ता १०वी (पूर्ण संस्कृत) कृतिपत्रिका

विद्यार्थी मित्रहो,

शालांत परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. संस्कृत हा गुणांची टक्केवारी वाढवणारा विषय म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आवडीचा ठरलेला आहे. आपणही संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी प्रयत्नशील असालच!

आपण संस्कृतच्या कृतिपत्रिकेचा विचार करता याचवर्षी पाठ्यपुस्तक बदलाबरोबर मूल्यमापनातही झालेल्या बदलाकडे डोळसपणे पाहाणे गरजेचे आहे. मूल्यमापनातील बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिल्यास ‘पैकीच्या पैकी गुण मिळवणे’ कसे सहजसाध्य करता येईल याकडे पाहता येईल.

संपूर्ण संस्कृत - ‘आमोद:’ या पाठ्यपुस्तकावर यंदाच १०० गुणांची कृतिपत्रिका असणार आहे. कृतिपत्रिकेची घटकनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे असणार आहे.

घटकनिहाय गुणविभागणी

घटक                           एकूण गुण

१) सुगमसंस्कृतम्      १५
२) गद्यम्                  २२
३) पद्यम्                  २०
४) लेखनकौशलम्     १५
५) भाषाभ्यास:          २०
६) अपठितम्             ०८

‘सुगमसंस्कृतम्’ या घटकामध्ये चित्रपदकोष संख्या, घड्याळी वेळ, वार व व्याकरणाच्या काही मूलभूत गोष्टींचा समावेश केला आहे. भाषेच्या व्यावहारिक उपयोजनाचे मूल्यमापन विभाग एकमध्ये आहे.

गद्य विभागामध्ये पाठांचे आकलन त्यावर आधारित संस्कृत प्रश्न, शब्दज्ञानांवरील कृती, अव्यये ओळखणे अशा प्रश्नांचा समावेश आहे. त्यासाठी परिच्छेद पठीतच असणार आहे. पाठातील माहितीचे पृथक्करण विद्यार्थ्याला करता येते की नाही, हे पाहण्यासाठी क्रमसंयोजन व रेखाचित्रांसारख्या कृ ती अंतर्भूत केल्या आहेत.

पद्य विभाग २० गुणांचा असून, आकलन, अन्वय सरलार्थ लेखन तसेच सुभाषिते शुद्ध व स्पष्ट लिहिणे, ही कृती महत्त्वाची ठरते. पद्याचा भावार्थ स्पष्टीकरणासाठी माध्यम भाषेतून अभिव्यक्त होण्याची संधी दिली आहे.

लेखन कौशल्यामध्ये वाक्यरचना, निबंध, संवाद, माध्यम भाषेतून संस्कृतातील अनुवाद या विविध कृतितून विद्यार्थ्यांचा भाषिक विकास साधला आहे.

भाषाभ्यासाच्या तालिका व व्याकरणाच्या कृती प्रामुख्याने पाठाखाली दिल्याप्रमाणे विविध प्रकारच्या असणार आहेत. त्यामध्ये तालिकापूर्तीसाठी इयत्ता ८वी व इयत्ता ९ वीच्या व्याकरणावर आधारित काही तक्ते पूर्ण करावयास असणार आहेत. सूचनेप्रमाणे बदल यासारख्या कृतींमध्ये प्रयोग व प्रयोजकावर प्रश्न निर्धारित केलेले असणार आहेत.

अपठीत विभागात नावाप्रमाणेच पुस्तकाबाहेरील एक उतारा व त्यावर ६ प्रकारच्या कृती विचारल्या जाणार आहेत. त्यापैकी कोणत्याही चार प्रकारच्या कृती बिनचूक सोडवावयाच्या आहेत. पद्याचा विचार करता अपठीत दोन श्लोक असणार आहेत. त्यापैकी एका श्लोकावर संस्कृतमध्ये उत्तर लिहावे लागेल व दुसरी कृ ती समानार्थी शब्दाची असेल व दुसरा श्लोक जालचित्र स्वरुपाच्या कृ तीने पूर्ण करायचा असणार आहे.

१०० गुणांच्या या संपूर्ण संस्कृतच्या कृतिपत्रिकेला सामोरे जाताना पुढील गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात.

१) संस्कृत भाषेच्या लेखन नियमांचा विचार कृतिपत्रिका सोडवताना निश्चितपणे व्हावा.
२) गद्यांचे प्रश्न सोडवताना परिच्छेदाचे नीट वाचन करुन कृती सोडवाव्यात.
३) पद्याच्या लेखनात सुभाषिते शुद्ध व स्पष्ट, संधीचा विचार करुन लिहावीत. पाठांतर पक्के असावे.
४) संस्कृतानुवाद, निबंध, चित्रवर्णनात छोट्या - छोट्या संस्कृत वाक्यांचा समावेश करावा.
५) भाषाभ्यासाच्याही कृती नीटपणे वाचून आकलनाने त्यातील बारकावे जाणून लिहाव्यात.
६) ‘अपठीत’ म्हणून घाबरुन न जाता पुन्हा पुन्हा वाचून अर्थसंगती लावून कृतींचा विचार केल्यास गोंधळ उडणार नाही.
७) कृतिपत्रिका पूर्ण सोडवल्यावर शांतपणे ऱ्हस्व, दीर्घ, लेखन नियम, संधी नियमांप्रमाणे आहे ना, हे नीट पहावे व आवश्यकतेनुसार बदल करावेत.
८) स्वच्छ, नीटनेटके, वळणदार अक्षर काढून कृतिपत्रिका आकर्षक व प्रभावी करण्याचा प्रयत्न करावा.

येणाऱ्या शालांत परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • मं. प्र. आगाशे,

फाटक हायस्कूल, रत्नागिरी

Web Title: Class 10th (Complete Sanskrit) Papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.