तरुणांनो आव्हाने पेला, नौसेनेत या

By Admin | Updated: November 22, 2014 01:03 IST2014-11-22T01:03:04+5:302014-11-22T01:03:04+5:30

लोकमत मुलाखत, हर्षद दातार यांचे अवाहन

Young people have challenged Pella, Navy | तरुणांनो आव्हाने पेला, नौसेनेत या

तरुणांनो आव्हाने पेला, नौसेनेत या

बुलडाणा: भारतीय नौदलात कमाडोर पदावर कार्यरत असलेले हर्षद दातार यांनी अभियांत्रिकी पदवी घेऊन नौसेनेत प्रवेश केला. विद्यापीठात दुसरे स्थान पटकावले असल्याने त्यांना कुठेही नोकरीची संधी मिळाली असती; मात्र आव्हाने पेलण्याची जिद्द, देशसेवेचा ध्यास असल्याने त्यांनी सब-लेफ्टनंट म्हणून नौसेनेत प्रवेश केला. येथील डॉ.सं.त्र्यं. कुल्ली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ज्ञानदान कार्यक्रमात व्याख्यानासाठी आले असता त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्न - तुम्ही नौदल करिअर म्हणून का निवडले ?
- अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असतानाच नौसेनेचे आकर्षण होते. वडील रेल्वेमध्ये सेवेत होते. त्यामुळे घरूनही सैनिकांचा वारसा नव्हता; मात्र देशभक्तीचा ध्यास असल्याने अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षातच नौसेनेसाठी माझी निवड झाली व त्यानंतर सब-लेफ्टनंट म्हणून मी नौसेनेत प्रवेश केला.

प्रश्न - नौदलाविषयी अनेकांना आकर्षण आहे; मात्र माहिती नाही, याची कारणे काय असावीत?
- तसं पाहिलं तर भारतीय सैन्य दलाच्या तीनही सेना या सारख्याच महत्त्वाच्या व ताकदीच्या आहेत. नौसेनेबाबत अनेकांना माहिती नाही, याचे कारण ही सेना समुद्रात काम करते. मिलीट्रीमधला सैनिक तुम्हाला गावात दिसतो, देशात आलेल्या अंतर्गत संकटामध्ये दिसतो, नौसेनेला तशी जबाबदारी मिळत नाही त्यामुळे सर्वसामान्यांना नौसैनिक वावरताना दिसत नाही. संकटाच्या वेळी, युद्घात किंवा राष्ट्रीय कार्यक्रमात नौसेना आपले काम करते तेव्हा लोकांच्या चर्चेत असते. खरं तर दोन्ही सेनेप्रमाणे नौसेनाही सतत कार्यरत असते.

प्रश्न - नौसेनेविषयी तरुणांमध्ये जास्त भ्रम आणि संभ्रम आहे?
- खरं तर भ्रम आणि संभ्रम असू नये. समुद्रातच राहावं लागतं, सहा सहा महिने घरी येता येत नाही. अशा स्वरूपाचा भ्रम असेल कदाचित मात्र तो खरा नाही. एकदा जमीन सोडली की तुम्ही समुद्रात असता व नेहमीच्या सर्वसामान्य व्यवस्थेशी तुमचा संबंध नसतो हे खरे असले तरी प्रत्येक मोहिमेची एक वेळ ठरलेली आहे. पाच दिवस, सहा दिवस असा कालावधी असतो. महिन्यातून किमान १0 दिवस तरी कुटुंबासोबत राहता येते. त्यामुळे नौसेनेविषयी भ्रम नको. ही सेना काहीतरी करू इच्छिण्याची उर्मी असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे.

प्रश्न - जहाजावरील सुरक्षेबाबत वैशिष्ट्ये काय, विशेषत: परदेशी जलसागरात कशी काळजी घेतली जाते?
- अनेकांना याबाबत माहिती नाही. परदेशी हद्दीमध्ये आपले जहाज असले तरी त्या जहाजावर प्रवेश करण्यापासून तर कारवाईपर्यंंत त्या देशाला भारताची परवानगी घेऊनच जावे लागते. दुसर्‍या भाषेत सांगायचे तर भारतीय नौसेनेचे कोण तेही जहाज कुठल्याही जलसागरात असले तरी ते जहाज म्हणजे सार्वभौम शक्ती असते. एक प्रकारे आपल्या देशाचा सार्वभौम तुकडा असते, त्या जहाजावरील कमांडिंग ऑफिसरला सर्व अधिकार असतात. कदाचित एखादा अपराध झाला तरी परदेशी भूमीवर आहे म्हणून तेथील कायदे लागू होत नाहीत तर ते भारताचेच अविभाज्य अंग मानले जाते.

प्रश्न - करिअर म्हणून नौसेना कितपत योग्य वाटते ?
- अतिउत्तम! तरुणांसाठी संधीचे क्षितिज मोकळे करून देणारी नौसेना आहे. यामध्ये थेट प्रवेश मिळतो, एनडीए, नेव्हल अँकेडमी अशा माध्यमातूनही परीक्षेद्वारा प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे आधी परीक्षा होते, नंतर शारीरिक तपासणी व त्या नंतर वैद्यकीय तपासणी असा क्रम आहे. त्यामुळे आपल्या क्षमतेला योग्य अशा संधीचा शोध तरुणांनी घ्यावा, एक करिअर म्हणून नौसेनेत यावे, असे मला वाटते.

प्रश्न - मिलिटरीसारखी भरती प्रक्रिया नौसेनेत नाही का ?
- ज्याप्रमाणे स्थलसेना जिल्हानिहाय भरती प्रक्रिया राबवते तशी व्यवस्था नौसेनेची नाही; मात्र प्रत्येक राज्यात एका केंद्रावर अशी भरती होते. त्या ठिकाणी नौसेनेचे अधिकारी परीक्षा घेतात, भरती प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक असते व तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला संधीची दारे खुली होतात.

प्रश्न - महिलांसाठी नौसेनेत कितपत संधी आहे?
- भरपूर संधी आहे. नौसेनेतील अधिकारी पदावर महिलांना थेट प्रवेश मिळतो. त्यामुळे नौसेना म्हणजे केवळ पुरुषांनाच प्रवेश असे नाही.

प्रश्न - तरुणांना काय संदेश द्याल?
- संदेश देण्यापेक्षा माझे आवाहन आहे. देशभक्तीचा ध्यास, परिङ्म्रमाची तयारी व स्वच्छ पारदर्शक आयुष्य जगण्याची इच्छा असेल तर नौसेनेत या. समाजानेही नौसेनेबाबत अधिकाअधिक माहिती घेऊन भावी पिढीवर संस्कार केले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात नौसेनेच्या व एकूणच सैन्याच्या कामगिरीवर धडे असावेत. ज्याप्रमाणे यावर्षी सीबीएसई अभ्यासक्रमात परमवीर चक्र प्राप्त सैनिकांवर धडा समाविष्ट केला जाणार असल्याची माहिती आहे, तशा स्वरूपात बालपणापासून संस्कार झाले, तर अधिक उपयुक्त होईल.

Web Title: Young people have challenged Pella, Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.