कामगारांना मिळणार किमान वेतनातील फरक
By Admin | Updated: August 4, 2014 23:40 IST2014-08-04T23:40:01+5:302014-08-04T23:40:01+5:30
बिरला कॉटसीनच्या कामगारांना व्यवस्थापनाद्वारे किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळत होते.

कामगारांना मिळणार किमान वेतनातील फरक
खामगाव : येथील औद्योगिक क्षेत्रातील बिरला कॉटसीनच्या कामगारांना व्यवस्थापनाद्वारे किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळत होते. गिरणी कामगार सभा संघटनेने याबाबत केलेल्या तक्रारीनंतर सहा.कामगार आयुक्त अकोला यांनी कामगारांना किमान वेतनातील फरकाची रक्कम कामगारांना देण्याचे आदेश दिले आहेत.
बिरला कॉटसीनमध्ये कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी देण्यात येत असल्याबाबत गिरणी कामगार सभा या मान्यताप्राप्त संघटनेकडून सरकारी कामगार अधिकारी बुलडाणा यांचेकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीमुळे २६ डिसेंबर १२ रोजी कामगार विभागाच्या अधिकार्यांनी कारखान्याला भेट देवून निरीक्षण केले असता कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळत असल्याबाबत निदर्शनास आले होते. त्यामुळे माहे जून २0१२ ते नोव्हेंबर २0१२ या कालावधीचे त्यांना असलेल्या अधिकाराप्रमाणे वेतन फरक देण्याबाबत व्यवस्थापनास १0 जानेवारी २0१३ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु व्यवस्थापनाने त्याची दखल घेतली नसल्याने सरकारी कामगार अधिकारी यांचे द्वारा सहा. कामगार आयुक्त (प्राधिकारी किमान वेतन अधि. १९४८) अकोला यांचे समक्ष प्रकरण दाखल करण्यात आले. त्यावरुन सहा. कामगार आयुक्त यांनी ५३१ कामगारांना उपरोक्त काळातील किमान वेतनातील फरक २ लाख ७६ हजार ६८५ रुपये देण्याबाबतचा आदेश २३ जुलै रोजी दिला असे गिरणी कामगार सभेचे सरचिटणीस कॉ. गोविंद पुरोहित यांनी कळविले आहे.