ग्रामीण आरोग्य केंद्राची कामे रखडली

By Admin | Updated: May 29, 2014 00:50 IST2014-05-29T00:40:46+5:302014-05-29T00:50:16+5:30

ग्रामीण रुग्णालयांची कामे गेल्या कित्येक दिवसांपासून रखडली आहेत.

Work of Rural Health Center | ग्रामीण आरोग्य केंद्राची कामे रखडली

ग्रामीण आरोग्य केंद्राची कामे रखडली

सिंदखेडराजा : नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण रुग्णालयांची कामे गेल्या कित्येक दिवसांपासून रखडली आहेत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील रखडलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे. त्यासोबतच शेंदुर्जन प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामही रखडले आहे. ते केव्हा सुरु होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. केंद्र शासनाने प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, यासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या. प्रत्यक्षात या योजनेचा लाभ किती लाभार्थ्यांना मिळतो, हे तपासले तर लाभार्थ्यांपेक्षा बोगस लाभार्थ्याची संख्या अधिक असते. ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी दिवसेंदिवस महागड्या होत चालल्या आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्री मंडळात आरोग्य मंत्री म्हणून डॉ.राजेंद्र शिंगणे यांची वर्णी लागली तेव्हा त्यांनी सिंदखेडराजा येथे ग्रामीण रुग्णालय, साखरखेर्डा येथे ग्रामीण रुग्णालय, शेंदुर्जन, अडगावराजा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या ग्रामीण जनतेसाठी सोयी उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले होते. सिंदखेडराजाचे ग्रामीण रुग्णालय अगोदरच मंजूर असल्याने काम सहा वर्षापूर्वीच पूर्ण झाले. राहिला प्रश्न साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयाचा. ग्रामीण रुग्णालयासाठी तत्कालीन सरपंच ठराव देत नाही म्हणून काम रखडत पडले, अशी खोटी थाप मारुन राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायतीत सत्ता मिळविली. राकाँ सरपंच कमलाकर गवई यांनी तीनवेळा ठराव दिला. संबंधीत अधिकार्‍यांशी संपर्क साधला, पण ग्रामीण रुग्णालयाला मुहूर्त सापडला नाही. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्जनला हलविणार म्हणून जिल्हा परिषद पाहिजे ती मदत करीत नाही. शेंदुर्जनला उपकेंद्राचा दर्जा आहे, पण कर्मचार्‍यांअभावी तेही बंदच राहते. त्यामुळे आरोग्याविषयी पाहिजे त्या सोयी ना साखरखेडर्य़ात ना शेंदुर्जनला मिळत नाहीत. राजकीय नेत्यांचे नंदनवन म्हणून शेंदूर्जन गावची ओळख आहे. परंतु या नंदनवनाला श्रीकृष्णच पोरका झाल्याने अज्ञात तापाने अख्खे गोकूळधाम व्यापले आहे, याकडे कोणाचेच लक्ष नाही. शेंदुर्जन पासून ६ कि.मी. अंतरावर हनवतखेड आणि हिवरा गडलींग या दोन्ही गावात एक महिन्यापासून तापाने थैमान घातले आहे. एका बालीकेचा तडफडून मृत्यू झाला. दोघांचे नेमके कारण समजले नाही. आठ महिन्यापूर्वी साखरखेडर्य़ातही अज्ञात तापाने उच्छाद मांडला होता. त्यात दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा उपचाराअभावी बळी गेला होता.तरीही आरोग्य यंत्रणा जागी होत नाही. त्यासाठी साखरखेर्डा येथे तत्काळ ग्रामीण रुग्णालय आणि शेंदुरजन येथे आरोग्य केंद्र सुरु करण्याच्या मागणीकडे कोणीच लक्ष देत नाही, हे विशेष !

Web Title: Work of Rural Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.