१४0 गाव पाणी पुरवठा योजनेचे काम गतिमान
By Admin | Updated: August 1, 2014 02:22 IST2014-08-01T02:02:10+5:302014-08-01T02:22:31+5:30
जळगाव शहरालाही मिळणार दिलासा : दोन महिन्यात २0 किमी जलवाहिनी पूर्ण.

१४0 गाव पाणी पुरवठा योजनेचे काम गतिमान
जळगाव जामोद : खारपाणपद्दय़ाच्या व किडनीग्रस्त रुग्णांच्या पृष्ठभूमीवर जळगाव जामोद शहरासह दोन तालुक्यातील १४0 गावांसाठी मंजूर झालेल्या दोनशे बावीस कोटी तेवीस लाखाच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन महिन्यात संग्रामपूर तालुक्यातील २0 किमीची पाईप लाईन टाकण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, असेच वेगाने काम सुरू राहिल्यास दोन वर्षात पूर्ण करावयाची ही योजना दीड वर्षातच कार्यान्वित होईल. विशेष म्हणजे पुढील ३0 वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करून या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आल्यामुळे या योजनेतून नागरिकांनासुद्धा मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याचे दिसून येते.
जळगाव व संग्रामपूर तालुका हा खारपाणपट्टय़ात मोडतो. गत काही वर्षांपूर्वी या भागातील नागरिकांना दूषित पाण्याच्या सेवनाने किडनीसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. शेकडो नागरिकांना किडनीच्या आजाराने आपले प्राण गमवावे लागले. परिणामी अनेक कुटुंबे उघड्यावर पडली. या सर्व प्रश्नावर एकच उपाय होता आणि तो म्हणजे या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे. याचे गांभीर्य आ.डॉ. संजय कुटे यांनी नऊ वर्षांपूर्वीच ओळखले आणि विविध संवैधानिक आयुधे वापरून हा प्रश्न शासन दरबारी लावून धरला. त्यामुळे या प्रश्नाची तीव्रता शासनाच्या लक्षात आल्यानंतर लोकवर्गणीचा विषय बाजूला सारत शासनाने वाण धरणावरून जळगाव शहरासह १४0 गावांच्या योजनेला २ डिसेंबर १३ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आणि लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी ४ मार्च १४ ला या योजनेवर निधी वर्ग करीत वर्क ऑर्डर देण्यात आली. द इंडियन स्युम पाईप लिमिटेड मुंबई या सक्षम कंपनीने २0 मे १४ पासून या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करुन अवघ्या दोन महिन्यात २0 किमीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण केले आहे. ही योजना अत्याधुनिक पद्धतीची राहणार आहे. या योजनेसाठी अति उच्च प्रतीचे एचडीपीईचे पाईप्स वापरण्यात येत आहेत. तसेच या योजनेंतर्गत वान धरणाच्या बाजूला एक जलशुद्धीकरण केंद्राची उभारणीही करण्यात येणार आहे. स्कॉडा अँन्ड अँटोमायझेशन या पद्धतीने या योजनेच्या पाणीपुरवठय़ाचे नियंत्रण होणार आहे. म्हणजेच कुठे किती पाणीपुरवठा झाला, प्रत्येक ठिकाणी किती पाण्याची आवश्यकता आहे, कुठे किती कमी व जास्त पाणी पोहचेल तसेच नळयोजनेचा कोणता भाग नादुरुस्त आहे, आदी सर्व बाबी इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर कार्यालयातच दिसणार आहे.