ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा

By Admin | Updated: November 21, 2015 01:56 IST2015-11-21T01:56:44+5:302015-11-21T01:56:44+5:30

चिखली तालुक्यातील मेरा बु. येथे दहा वर्षांपासून सोसावी लागते पाणीटंचाईची झळ.

Women's Garbha Morcha on Gram Panchayat | ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा

ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा

चिखली (जि. बुलडाणा) : गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रा.पं.कडे सुमारे सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही गत १0 वर्षांंपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणार्‍या मेरा बु. वासीयांना अद्यापही सुमारे चार रुपये प्रति हंडाप्रमाणे विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने संतप्त महिलांनी २0 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता. तालुक्यातील मेरा बु. हे गाव वर्षातील १२ महिने तहानलेले असते. गत दहा वर्षांंपासून गावास तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असल्याने ग्रामस्थांना ३ ते ४ रुपये प्रति हंडा प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते. तेही वेळेवर मिळत नसल्याने पाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते. त्यातच आर्थिक परिस्थिती बिकट असणार्‍या, मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणार्‍या, गावातील विषेशत: महिलांना पाण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात. दरम्यान, गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीला सात कोटी तीन लाख रुपयांचा निधी गत पाच वर्षांंपासून उपलब्ध झाल्यानंतर काम पूर्ण करण्याचा कालावधीही उलटला असताना गावाची तहान भागविली जात नसल्याने संतप्त महिलांनी २0 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून सुरळीत पाणीपुरवठय़ाची मागणी केली. दरम्यान, पाणीपुरवठय़ाची ही समस्या तातडीने निकाली न लावल्यास तहसील व जि.प. कार्यालयावर मोर्चा करण्याचा इशारासुद्धा यावेळी महिलांनी दिला. या मोर्चात गावातील शेकडो महिलांचा सहभाग होता.

Web Title: Women's Garbha Morcha on Gram Panchayat