महिलेने बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएममधून काढले ७00 रुपये
By Admin | Updated: March 4, 2015 01:49 IST2015-03-04T01:49:32+5:302015-03-04T01:49:32+5:30
मातोळा येथील घटना.

महिलेने बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएममधून काढले ७00 रुपये
मोताळा (जि. बुलडाणा) : शहरातील एका स्टेट बँक खातेदाराच्या मोबाइलवर अज्ञात महिला ठगाने फोन करून बँकेची अधिकारी असल्याचे सांगून एटीएम क्रमांक घेऊन एटीएम खात्यातून ७00 रूपये काढून फसवणूक केली. ही घटना सोमवार, २ मार्च रोजी दुपार दरम्यान घडली.
मोताळा येथील वार्ड क्रमांक पाचमधील आलम शाह भिकन शाह यांचे स्थानिक स्टेट बँक शाखेत खाते असून, सोमवारी दुपारी येथील स्टेट बँक शाखेजवळून मोताळा फाट्यावर जात होते. दरम्यान, अज्ञात महिला ठगाने ८४८१0२१९१४ या मोबाइल क्रमांकावरून आलम शाह यांच्या ९४0३२५२४२४ या क्रमांकावर फोन करून बँक अधिकारी बोलते, असे भासवून त्यांच्या एटीएमचा १६ अंकी पीन क्रमांक घेतला व सोमवार २ मार्च रोजी दुपारदरम्यान एटीएम खात्यातील ७00 रुपये काढून घेतले. ही बाब आलम शाह यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेचच आलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला; परंतु क्रमांक स्विच ऑफ येत गेला. तत्काळ आलम शाह यांनी स्टेट बँक गाठून शाखा व्यवस्थापकाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. बँकेनी लगेचच त्यांना उर्वरित रक्कम काढून घेण्याचा सल्ला देत, एटीएम कार्ड तत्काळ ब्लॉक करण्याचे सांगितले. आलम शाह यांनी खात्यातील उर्वरित रक्कम काढून एटीएम कार्ड ब्लॉक केले. या प्रक्रिये दरम्यान फसवणूक करणार्या ठगाकडून एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र खात्यात पैसे शिल्लक नसल्याने मोठी रक्कम लांबवण्यापासून आलम शाह वाचले. तालुकाभरात या आगोदरही बँक अधिकारी भासवून खोटे कॉल करून एटीएमचा पीन क्रमांक विचारल्याच्या घटना घडलेल्या आहेत.