पत्नीस जाळणा-या पतीस जन्मठेप
By Admin | Updated: September 17, 2014 01:34 IST2014-09-17T00:59:25+5:302014-09-17T01:34:11+5:30
सिंदखेडराजा तालुक्यातील घटना; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.

पत्नीस जाळणा-या पतीस जन्मठेप
मेहकर : सिंदखेडराजा तालुक्यातील गुंज येथे पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याची घटना २४ नोव्हेंबर २0१२ रोजी घडली होती. याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीस १५ सप्टेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, गुंज येथील सीमा जनार्दन तुपकर हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती जनार्दन गुलाबराव तुपकर हा वारंवार मारहाण करायचा. दरम्यान जनार्दनने पत्नी सीमा हिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळले. यामध्ये तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सीमाच्या वडिलांनी साखरखेर्डा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी सखोल तपास करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. त्यात सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.कलोती यांच्या समक्ष उभय दोन्ही पक्षाच्यावतीने युक्तीवाद होऊन सीमाच्या खूनप्रकरणी कलम ३0२ भादंविनुसार जनार्दन तुपकर याला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड.अशोक हिंगणे यांनी काम पाहिले आहे.