अचानक कशामुळे गळताहेत केस? टक्कल पडणाऱ्यांची संख्या ५१ वर! घरोघरी सर्वेक्षण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:49 IST2025-01-09T13:48:07+5:302025-01-09T13:49:33+5:30
चर्मरोग तज्ज्ञांचे पथकाकडून तपासणी सुरू; नमुन्यांच्या अहवालानंतरच समोर येईल नेमके कारण

अचानक कशामुळे गळताहेत केस? टक्कल पडणाऱ्यांची संख्या ५१ वर! घरोघरी सर्वेक्षण सुरू
अनिल उंबरकार
लोकमत न्यूज नेटवर्क, शेगाव (जि. बुलढाणा) : तालुक्यातील काही गावांमध्ये केस गळून टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता ५१ वर पोहोचली आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेऊन प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावांत तपासणी सुरू केली आहे. हा फंगल इन्फेक्शनचा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावअंतर्गत बोंडगाव येथे महिला, पुरुष, लहान मुले, मुली यांचे केस गळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
‘घाबरण्याचे कारण नाही’
लगतच्या गावातही असा संसर्ग दिसून येत असल्याने आरोग्य विभागाकडून या प्रकरणांची माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. शेगाव तालुक्यात तज्ज्ञ डाॅक्टरांकडून सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. यावर उपाययोजनाही करण्यात येतील, अशी माहिती येथील आमदार तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
त्यांना पुन्हा केस येतात का? : केस गळून टक्कल पडत असले तरी लवकरच त्यावर केस येणे सुरू झाले आहे. बुधवारी चर्मरोग तज्ज्ञांच्या पथकाने गावांमध्ये सर्वेक्षण केले. त्यामधून ही बाब समोर आली आहे.
हे नेमके कशामुळे?
प्राथमिक तपासणीत फंगल संसर्गामुळे केस गळती होत असल्याची शक्यता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नमुने तपासणीसाठी पाठविले
- संसर्ग झालेल्या गावातील पाणी नमुने जैविक व रासायनिक तपासणीसाठी ७ जानेवारी पाठविण्यात आले आहेत. अहवालाची प्रतीक्षा आहे.
- सात नागरिकांच्या स्कीन तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. ते अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविले आहेत.
गावात स्थिती कशी आहे?
- अमूक शॅम्पू लावल्याने किंवा खाऱ्या पाण्याने केस धुतल्याने केस गळत असल्याचे गावकरी बोलत आहेत. याबाबत तीनही गावांत भीतीदायक वातावरण तयार झाले आहे.
- याआधी गावात केस गळून टक्कल पडल्याचा असा संसर्गाचा प्रकार कधीही घडलेला नाही अशी माहिती भोनगाव येथील सरपंच राजश्री गवई यांनी दिली आहे.
आरोग्य विभाग काय करतोय?
- शेगाव तालुक्यात घरोघरी सर्वेक्षण सुरू
- गावात चर्मरोग तज्ज्ञांचे पथक दाखल
- तपासणीसह गावकऱ्यांच्या शंकांचे निरसन
किती जणांना संसर्ग?
- भोनगाव ३
- हिंगणा वैजिनाथ ६
- घुई ७
- कठोरा ७
- कालवड १३
- बोंडगाव १६