कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी
By Admin | Updated: August 1, 2014 02:20 IST2014-08-01T01:57:53+5:302014-08-01T02:20:51+5:30
मेहकर तालुक्यातील परिस्थिती पेरणी उलटल्याने शेतकरी हवालदिल

कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी
मेहकर : तालुक्यात तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दमदार पावसाने हजेरी लावली; मात्र बियाणे खराब निघल्याने, तर काही ठिकाणी मृग नक्षत्राच्या सुरुवातीस पेरणी केल्याने तालुक्यातील पेरण्या उलटल्या आहेत. तालुक्यात सद्य:स्थितीत कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी करावी लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मृग नक्षत्राच्या सुरुवातीस काही शेतकर्यांनी धूळ पेरणी केली होती; परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे ती धूळ पेरणी धुळीतच गेली. तालुक्यात १ ते २ पावसावरच काही शेतकर्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्यांनी पिकास पाणी देण्यास सुरुवात केली; परंतु ते पाणी शेतीस कमी पडत असल्याने शेतात उभी असलेली पिकेही वाळायला लागली. त्यामुळे बहुतांश शेतकर्यांच्या पेरण्या उलटल्या. त्यानंतर चातकाप्रमाणे शेतकर्यांना पावसाची वाट पाहावी लागली. पावसासाठी येथील शेतकर्यांनी मशीदमध्ये प्रार्थना केली. तर अनेक मंदिरांवर वरुणराजाला साकडेही घालण्यात आले. जुलै महिन्याच्या शेवटी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाले असून, त्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीस सुरुवात केली. परंतु बियाणे खराब निघल्यामुळे अनेक शेतकर्यांच्या खरीप हंगामाच्या पेरण्या उलटल्या असून, त्यांना आता दुबार पेरणी करावी लागत आहे. तर काही शेतकर्यांना तिबार पेरणीही करावी लागत असल्याने शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. या दुबार व तिबार पेरणी होणार्या शेतांचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकर्यांमधून जोर धरत आहे.