पश्चिम बंगालमधील तरुणीची चंदनपुरात हत्या
By संदीप वानखेडे | Updated: October 14, 2023 17:01 IST2023-10-14T17:00:53+5:302023-10-14T17:01:16+5:30
दाेन संशयित युवक फरार, साेयाबीन साेंगणीसाठी पुण्यातून आले हाेते गावात

पश्चिम बंगालमधील तरुणीची चंदनपुरात हत्या
अंढेरा (बुलढाणा) : साेयाबीन साेंगणीसाठी आलेल्या मजूर युवतीची चिखली तालुक्यातील चंदनपूर येथे हत्या झाल्याची घटना १३ ऑक्टाेबर राेजी रात्री घडली. या युवतीबराेबर आलेले दाेन युवक पसार झाले आहेत. याप्रकरणी १४ ऑक्टाेबर राेजी अंढेरा पाेलिसांत तक्रार देण्यात आली आहे. आराेपींच्या शाेधासाठी अंढेरा पाेलिस व एलसीबीचे एक पथक रवाना झाले आहे.
चिखली तालुक्यातील चंदनपूरमध्ये एक युवती व दोन युवक कामानिमित्त १३ ऑक्टोबर रोजी गावात आले होते. त्यांची राहण्याची सोय एका घरामध्ये केली होती. रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणीच ते तिघे जण त्या घरामध्ये झोपले होते. शेती पंपाची मोटर चालू करण्यासाठी शेतात जाण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याला त्या घराचा दरवाजा ११ ते १२ वाजेच्या सुमारास उघडा असल्याचे आढळला.
घरामध्ये जाऊन बघितले असता त्या ठिकाणी फक्त ती युवतीच जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी ही बाब सरपंच व गावातील इतर व्यक्तींना सांगितल्याने त्यांनी या घटनेची माहिती अंढेरा पोलिस स्टेशनला दिली. घटनेचे गांभीर्य पाहता अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील व पोलिस कर्मचारी यांनी तत्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. घटनेच्या ठिकाणी १६ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला व त्या युवती सोबत असलेले दोन तरुण रात्रीच फरार झाल्याचे समोर आले. ठाणेदार विकास पाटील यांनी सूत्रे हाती घेऊन रात्रीच त्या दोन फरार युवकांचा शोध घेतला असता ते युवक कुठेच आढळून आले नाही.