शेगावात आठवडी बाजार रस्त्यावर

By Admin | Updated: June 5, 2014 23:09 IST2014-06-05T23:07:59+5:302014-06-05T23:09:32+5:30

शेगावात एकात्मिक शहर सुधार योजनेचा बट्टयाबोळ; नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास.

Weekend market street in Shiga | शेगावात आठवडी बाजार रस्त्यावर

शेगावात आठवडी बाजार रस्त्यावर

शेगाव: शेगाव शहरामध्ये एकात्मिक शहर सुधार योजनेअंतर्गत दैनिक व आठवडी बाजाराकरीता ८४ ओट्यांचे बांधकाम झालेले आहे. मात्र ते बांधकाम चुकीच्या पध्दतीने झाले असल्यामुळे या योजनेचा पुर्णत: खेळखंडोबा झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजाराला जागाच नसल्याने शहरातील रस्त्यावरच हा बाजार भरतो. याकडे मात्र नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शेगाव शहरात एकात्मिक शहर सुधार योजनेअंतर्गत १0 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेगाव नगर परिषद आरक्षण क्र.३५ येथे दैनिक बाजाराकरीता ९६ ओटे व आठवडी बाजाराकरीता ९६ असे एकुण १९२ ओट्यांचे बांधकाम २00९ मध्ये प्रस्तावित करण्यात आले. त्यापैकी नगर परिषदने ८४ ओट्यांचे बांधकाम पुर्ण केलेले आहे. या ओट्यांच्या बांधकामावर सदर योजनेमधून १३.२0 लक्ष खर्च केले आहे. भाजीबाजाराचे अत्यंत चुकीच्या पध्दतीने झाल्याची ओरड करीत या ठिकाणी कोणताही भाजी विक्रेता बसण्यास तयार नाही. भाजी विक्रेत्याचा या बाजाराला विरोध असल्यावरही नगर परिषदने या ८४ ओट्यांचा लिलाव मांडला होता. परंतु या ८४ पैकी फक्त ३६ ओट्यांचा लिलाव करण्यात आला. उर्वरीत ४८ ओट्यांवर भाजी विक्रेत्यांकडून बोलीच लावण्यात आलेली नाही. साप्ताहिक बाजारही रस्त्यावर भरत असल्याने दर मंगळवारी जागेवरून नेहमीच भाजी विक्रेत्यांचे वाद होतात. जागेसाठी काही लोक भाजी विक्रेत्यांकडून बळजबरीने वसुली करीत असल्याचे चित्र आहे. नगर परिषदने दैनिक बाजार वसुलीही खासगी करणात दिलेली आहे. बांधकाम करण्यात आलेल्या ओट्यांवर जनावरांचा मुक्त संचार आहे. याशिवाय ओट्यांचा परिसरातील काही लोक प्रांतविधीसाठी देखील वापर करीत असल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. या समस्येकडे नगर पालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची मागणी भाजी विक्रेत्यांसह रस्त्यावर बाजार भरणार्‍या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Weekend market street in Shiga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.