बुधवारी १० हजार जणांना मिळाला दुसरा डोस, ९० हजार जणांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 10:54 IST2021-05-13T10:54:15+5:302021-05-13T10:54:37+5:30
Buldhana News : तथापी, अजुनही ९० हजार लाभार्थी दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

बुधवारी १० हजार जणांना मिळाला दुसरा डोस, ९० हजार जणांना प्रतीक्षा
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गत अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या तब्बल १० हजारावर लाभार्थ्यांना बुधवारी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस मिळाला. तथापी, अजुनही ९० हजार लाभार्थी दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना प्राधान्य क्रमाने आता लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात जवळपास एक लाख नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. मुळातच लसीचा पुरवठाच कमी होत असल्याने जिल्ह्यातील १०२ पैकी सुरू असलेल्या ९५ लसीकरण केंद्रांवर लसीचे डोस पोहोचवण्याची कसरत आरोग्य प्रशासनास करावी लागत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या डोसला प्राधान्य देताना लसीकरण केंद्रांवर गोंधळ होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यास आतापर्यंत ३ लाख १५ हजार ९६९ लसीचे डोस उपलब्ध झालेले आहेत. त्यापैकी २ लाख ५२ हजार ३६३ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर ६३ हजार ५९६ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे दुसरा डोस देण्याचा वेग मंद आहे. त्यातच राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण मोहिमेला धक्का लागला आहे. परिणामी उपलब्ध असलेले डोस हे प्राधान्य क्रमाने ज्यांचा पहिला डोस झालेला आहे व दुसरा डोस देण्याची वेळ आलेली आहे, अशा व्यक्तींना ते देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या लसीकरण विभागाने आता सज्जता सुरू केली आहे. बुधवारी १० हजार ४९१ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. यावरून ही बाब स्पष्ट होते.