पाणीसाठा घटला
By Admin | Updated: July 4, 2014 00:12 IST2014-07-04T00:10:12+5:302014-07-04T00:12:41+5:30
परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. केवळ १९ टक्के पाणी शिल्लक असून, आगामी काळात पाऊस झाला नाही तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

पाणीसाठा घटला
परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. केवळ १९ टक्के पाणी शिल्लक असून, आगामी काळात पाऊस झाला नाही तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे जिल्हावासियांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
यावर्षी सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी अजूनही पावसाला प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. गतवर्षी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले होते. या प्रकल्पातील पाणी आतापर्यंत पुरले. परंतु यापुढे मात्र परिस्थिती गंभीर होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात येलदरी हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्याखालोखाल सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता आहे. जिंतूर तालुक्यात करपरा आणि गंगाखेड तालुक्यात मासोळी हे दोन मध्य प्रकल्प असून, २२ लघू प्रकल्प आहेत. येलदरी धरणात ३९.६० टक्के पाणी आहे तर ुलोअर दुधना प्रकल्पात ३२ टक्के पाणी शिल्लक आहे. करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ३.८३० दलघमी (१५ टक्के) तर मासोळी मध्यम प्रकल्पात ८.१९४ दलघमी (३० टक्के ) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर लघू प्रकल्पांमध्ये ५.६०९ दलघमी म्हणजे १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
मोठ्या प्रकल्पांबरोबरच मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील पाणी सिंचनाबरोबरच पिण्यासाठी देखील वापरले जाते. या प्रकल्पांवर अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. दिवसेंदिवस पाणीसाठ्यात घट होत असल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर असून, पाणीटंचाई उग्र होत आहे.
यावर्षी अजूनही पावसाला प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. एकही मोठा पाऊस अद्याप झालेला नाही. पाऊस पडावा म्हणून देवाकडे साकडे घातले जात आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा लक्षात घेता आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
येलदरीत ४०, लोअर दुधनात ३२ टक्के
यावर्षी येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३९ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ३०१ मि.मी. पाऊस झाला होता. पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठ्यात घट झाली. सध्या ३२०.५१३ दलघमी (३९.६० टक्के) उपयुक्त पाणीसाठा या धरणात उपलब्ध आहे. तर लोअर दुधना धरणामध्ये एकूण ५२ टक्के पाणीसाठा असून, त्यापैकी ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.