पाणीटंचाई: विकतच्या पाण्यावर भागवावी लागते तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 14:15 IST2019-05-31T14:15:18+5:302019-05-31T14:15:23+5:30
दररोज २० ते २५ रुपये मोजून खाजगी पाणी फिल्टर प्लांट धारकांकडून कॅन विकत घेऊन आपली तहान भागवतात.

पाणीटंचाई: विकतच्या पाण्यावर भागवावी लागते तहान
बिबी: बिबी येथे पाणीपुरवठा होणाºया जलाशयात पुरेसा जलसाठा असून सुद्धा योग्य नियोजन नसल्यामुळे बीबी वासियांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वापरासाठी टँकरद्वारे पाणी विकत घेतात. दररोज २० ते २५ रुपये मोजून खाजगी पाणी फिल्टर प्लांट धारकांकडून कॅन विकत घेऊन आपली तहान भागवतात.
गावात मोलमजुरी करणाºयांची संख्या जास्त आहे. त्यांना दररोज एवढे पैसे मोजून पाणी घेणे परवडत नाही. ते सर्वजण गावच्या पुर्वेस असणाºया मशानभूमी जवळील हातपंपाच्या पाण्याने आपली गरज भागवतात. परंतु तो हातपंप चार पाच दिवसापासून नादुरूस्त आहे. त्यामुळे गावकºयांना पाणीच मिळेनासे झाले आहे. नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा होतो, तो २० दिवसाआड तर कधी एक-एक महिन्याच्या अंतराने. पाणी पुरवठा करणाºया विहिरीला गावकºयांना पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध आहे; परंतु नियोजना अभावी पाणी समस्या भेडसावत आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी रात्री-बेरात्रीच्या वेळेस सोडल्या जाते. विहिरीतील पाणी गावात बांधलेल्या पाण्याच्या टाकीत न सोडता थेट विहिरीतून नळाला सोडले जाते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव कारणीभूत असून लोकांना नहाक त्रास सहन करावा लागत आहे.
आरोग्य धोक्यात
फिल्टर प्लांटच्या टाकाऊ पाण्याचा वापरही काही गोरगरीब मजूर करीत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांना स्वच्छ व मुबलक पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा गोरगरीब जनते कडून केली जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे. या निवेदनावर गणेश आटोळे, लक्ष्मण लोहारे, सोहेल खान, योगेश लोंढे, संतोष गाढवे, वैभव महाजन, आकाश जाधव, प्रकाश वाकळे व राहुल वानखेडे यांच्या सह्या आहेत.