वाहन चालवताना व्हिडीओ पाहणे चालकाच्या अंगलट, गुन्हा दाखल
By संदीप वानखेडे | Updated: October 18, 2023 19:03 IST2023-10-18T19:03:48+5:302023-10-18T19:03:57+5:30
चालकांच्या चुकांमुळे समृद्धी महामार्गावर गत काही दिवसांपासून अपघात वाढले आहेत.

वाहन चालवताना व्हिडीओ पाहणे चालकाच्या अंगलट, गुन्हा दाखल
बुलढाणा : चालकांच्या चुकांमुळे समृद्धी महामार्गावर गत काही दिवसांपासून अपघात वाढले आहेत. पुणे येथून नागपूर येथे जात असलेल्या खासगी बसच्या चालकाने बस वेगात असताना हेडफाेन लावून व्हिडीओ पाहीला़ हा प्रकार एका प्रवाशाने चित्रीत करून समाजमाध्यमावर व्हायरल केला हाेता़ या व्हिडीओची दखल आरटीओकडून मेहकर पाेलिसात तक्रार देण्यात आली़ त्यावरून पेालिसांनी खासगी बसचा चालक धनंजय कुमार रविंद्र नाथ सिंह विरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
समृद्धी महामार्गावर गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत़ अनेक अपघात हे चालकांच्या चुकींमुळे घडल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहेत़ तरीही खासगी बसचे चालक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे़ १५ ऑक्टाेबर राेजी पुणे येथून नागपूरसाठी निघालेल्या खागसी बस क्रमांक एमएच १९ सीएक्स ५५५२ चा चालक बस भरधाव असताना माेबाईलवर हेडफाेन लावून व्हिडीओ पाहत हाेता़ हा प्रकार बसमधील एका प्रवाशाने चित्रीत करून १६ ऑक्टाेबर राेजी समाज माध्यमांवर व्हायरल केला हाेता़ या व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत बुलढाण्याचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्या आदेशाने सहायक माेटार वाहन निरीक्षक अनुजा काळमेघ यांनी खासगी बसच्या चालकाविरुद्ध मेहकर पाेलिसात तक्रार दिली. त्यावरून पाेलिसांनी चालक धनंजय कुमार रविंद्र नाथ सिंह मुंबई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.