दुष्काळाच्या घोषणोची प्रतीक्षा
By Admin | Updated: August 19, 2014 23:19 IST2014-08-19T22:33:55+5:302014-08-19T23:19:25+5:30
टंचाई जाहीर : तीन तालुके वगळले

दुष्काळाच्या घोषणोची प्रतीक्षा
बुलडाणा : जिल्हय़ात सरासरी ५0 टक्कांपेक्षा कमी पाऊस गृहीत धरतांना प्रशासानाने १३ ऑगस्टची आकडेवारी गृहीत धरली आहे. या प्रकारामुळे टंचाई जाहिर करताना जिल्ह्यातील बुलडाणा, जळगाव जामोद व संग्रामपूर हे तीन तालुके वगळण्यात आले आहे. वास्तविक संपूर्ण जिल्हाभरात पावसाचे प्रमाण अनियमीत असल्याने सरासरीच्या ५0 टक्के वर पडलेला पाऊसही पिके वाचविण्यासाठी पुरेसा नाही. पावसाने तब्बल महिनाभरापासुन ओढ दिली असल्याने टंचाई नकोच आता दूष्काळच जाहिर करण्याची गरज व्यक्त होत आहे.
शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसले आहेत. गेल्या हंगामापासूनच शेतकर्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा जबर फटका सोसावा लागतोय. यंदा त्यात भर पडली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकर्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. शासनाने दहा तालुक्यात टंचाई घोषीत केली असली तरी संपूर्ण जिल्हाच दूष्काळाच्या उंबरठयावर आहे. उडिद, मूग पिकाचा कालावधी निघून गेल्याने या पिकांचा पेरा कमी झाला आहे. त्यामुळे आता सोयाबीन व कापूस पिकांवरच भिस्त असली तरी पावसाच्या दडीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोयाबीनला फटका
सोयाबीन हे तेलबिया वर्गातील पीक असल्यामुळे भरपूर पावसाची आवश्यकता असते. यावेळी मुळातच पेरणी उशीरा झाल्याने आता कुठे पिके वर आली आहेत त्यामुळे पाऊस गरजेचा आहे. मात्र,पावसाने दडी मारली तर उत्पादन घटते. जिल्हय़ात सोयाबीन, कपाशी ही प्रमुख पिके असून सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे.
केवळ ४२ % पिक विमा
जिल्ह्यात पावसाअभावी उशीरा झालेल्या पेरण्यांचा फटका पिक विमा उतरविण्यालाही बसला आहे. त्यातच सोयाबीनचा समावेश नसल्याने केवळ ४२ टक्के म्हणजेच १ लाख ७५ हजार ४१६ खातेदारांनीच पिक विमा उतरविला आहे.यामुळे १ लाख २१ हजार ४५२ हेक्टर क्षेत्र संरक्षीत झाले आहे.
कोरडवाहू शेतकरी विवंचनेत
जिल्ह्यात पावसाअभावी जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात पडलेला तुरळक पाऊस आणि तुरळक सरी वगळता तब्बल २१ दिवसांपासून वरुणराजाने हजेरी न लावल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेती पाण्याअभावी पूर्णत: धोक्यात आली आहे. जिल्हय़ात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र सर्वाधिक असल्यामुळे सिंचनाच्या सोईसुविधाही अल्प प्रमाणात आहे. अशात ओलीताच्या शेतीला पाणी देण्यासाठी भारनियमनाचा फटका बसत आहे.