वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पातील प्राथमिक अडचणी दूर

By Admin | Updated: March 23, 2017 02:36 IST2017-03-23T02:36:10+5:302017-03-23T02:36:10+5:30

मुख्यमंत्र्याचा पुढाकार तुपकरांना जलसंपदामंत्र्यांची ग्वाही

Wainganga- Removing the primary difficulties of the Nalganga river link project | वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पातील प्राथमिक अडचणी दूर

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पातील प्राथमिक अडचणी दूर

सुधीर चेके पाटील
चिखली (बुलडाणा), दि. २२- सुमारे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार्‍या वैनगंगा-नळगंगा या नदीजोड प्रकल्पातील प्राथमिक अडचणी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने दूर झाल्या आहेत. या योजनेचा सविस्तर अहवाल मार्च अखेरीस पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पासाठी केंद्र शासनाचा निधी प्राप्त करून घेण्यासाठी प्राधान्य दिल्या जाणार असल्याचे आश्‍वासन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांना दिले आहे.
प्रस्तूत नदीजोड प्रकल्प पूर्ण झाल्यास आत्महत्याग्रस्त विदर्भातील या जिल्हय़ांमध्ये भरभराट येईल. बुलडाणा व अकोला या अवर्षणप्रवण जिल्हय़ातील खारपाणपट्यात तसेच जिगाव प्रकल्पाचे लाभक्षेत्र सोडून घाटाखालील अधिकाधिक गावांना पाणी मिळू शकेल. विदर्भातील प्रस्तावित औष्णिक विद्युत प्रकल्पांनाही पाणी उपलब्ध होऊन या भागाची विजेची मागणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून विदर्भासाठी नवसंजीवनी ठरणार्‍या या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुषंगाने जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना याबाबत उचित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाजन यांनी तुपकर यांना याबाबत लेखी खुलासा पाठविला आहे.
यामध्ये राष्ट्रीय जलविकास अभिकरण (एनडब्युडीए) मार्फत वैनगंगा-नळगंगा योजनेचा अभ्यास सुरू असून १९१२ दलघमी पाणी वापराकरीता राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने जुलै २0१५ मध्ये योजनेचा व्यवहार्यता अहवाल नव्याने तयार केला आहे. राष्ट्रीय जलविकास अभिकरणाकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मार्च २0१७ पर्यंंत पूर्ण करण्याचे नियोजित असून वळण कालव्याचे सर्वेक्षण १८९.५ किमी वर्धा नदीपर्यंंत पूर्ण करण्यात आले आहे. भूगर्भीय व भूतांत्रीक अन्वेषणाअंतर्गत ९४ किमी भागाचे ह्यमॅपींगह्ण पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय जलविकास अभिकरण अन्वेषण विभाग नागपूर, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ नागपूर व अमरावती यांच्या मार्फत संयुक्तरित्या नदीजोड कालव्याची संरेख, साठा स्थळे व लाभक्षेत्र आदी बाबी ठरविण्यात येत असून राष्ट्रीय जलविकास अभिकरणाकडून वैनगंगा-नळगंगा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यावर शासन स्तरावरून यास मान्यता प्राप्त झाल्यावर प्रकल्पास प्राधान्य देवून केंद्र शासनाचा निधी या योजनेकरीता प्राप्त करण्यास्तव प्रयत्न करण्यात येतील, असेही जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी या लेखी कळविले आहे.

प्रकल्पाचे पाणी मराठवाड्याकडे नेण्याचा घातला होता घाट
नदीजोड प्रकल्पाची उपयोगीता व गरज लोकमतमध्ये वृत्तमालीकेतून उजेडात आणल्यानंतर रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रकल्पाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास न्यावा व विदर्भाचे पाणी मराठवाड्याला वळविण्याचा प्रयत्न हाणून पाडावा, अशी मागणी केली होती.या प्रकल्पातून बुलडाणा आणि अकोला जिल्हा वगळून यवतमाळमार्गे हिंगोली, जालना, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड या जिल्हय़ांना पाणी वळते करण्याचे प्रयत्न मध्यतंरी सुरू होते. मात्र, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पाबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने मुख्यमंत्र्यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना याबाबत उचित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Web Title: Wainganga- Removing the primary difficulties of the Nalganga river link project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.