कॅनडाच्या पथकाची आनंद सागरला भेट
By Admin | Updated: June 30, 2014 02:10 IST2014-06-29T23:27:45+5:302014-06-30T02:10:46+5:30
शेगाव: आनंद विहार व मंदिरा परिसराची पाहणी

कॅनडाच्या पथकाची आनंद सागरला भेट
शेगाव : कॅनडा व अमेरिका येथे उल्कापातामुळे निर्माण झालेल्या विवरांना पर्यटनस्थळाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्या कॅनडा येथील १५ तज्ज्ञांचे पथक बुलडाणा जिल्ह्यात २0 जून रोजी दाखल झाले आहे. या पथकाने आज शनिवारी शेगाव येथील विज्ञान व आध्या ित्मकतेच्या पायावर साकारण्यात आलेल्या मनोहारी उद्यान आनंद सागरला भेट दिली.
कॅनडा येथील तज्ज्ञ डॉ.फ्रान्सीस बोडार्ड आणि डॉ.डोमॅनिक लॅपोनेट यांच्या नेतृत्वात दाखल झालेले हे पथक तब्बल दीड महिना लोणार येथे थांबून लोणार सरोवराला पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर आणण्यासाठी अभ्यास करणार आहेत. त्या दृष्टीने आज शनिवारी त्यांनी शेगाव येथील आनंद सागर, श्री संत गजानन महाराज मंदिर आणि आनंद विहारला भेट देऊन पाहणी केली. दुपारी आनंद सागर पाहतांना या तज्ज्ञ मंडळींनी आनंद सागरच्या प्रत्येक प्रकल्पांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी त्यांच्या सोबत प्रो.गजानन खरात, पल्लवी सोनवणे, शिप्रा बोरा, योगेश राणे, विशाल चांडक, दिनेश बोराळे यांची उपस्थिती होती. डॉ.फ्रान्सीस बोडार्ड यांनी आनंद सागर आणि आनंद विहार च्या निर्माण संदर्भात माहिती संकलित केली. हे निर्माण कार्य आपल्याला लोणार सरोवरच्या विस्तारबाबत अत्यंत उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.