गॅस महागल्याने इंधन जमा करण्यासाठी ग्रामस्थांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST2021-05-10T04:34:49+5:302021-05-10T04:34:49+5:30
किनगाव जट्टू : शासनाने मोठा गाजावाजा करून पर्यावरणयुक्त गाव संकल्पना चूलमुक्त धूरमुक्त अभियान राबवून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सबसिडीवर स्वयंपाकाचे गॅस ...

गॅस महागल्याने इंधन जमा करण्यासाठी ग्रामस्थांची धडपड
किनगाव जट्टू : शासनाने मोठा गाजावाजा करून पर्यावरणयुक्त गाव संकल्पना चूलमुक्त धूरमुक्त अभियान राबवून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सबसिडीवर स्वयंपाकाचे गॅस दिले; परंतु गत चार महिन्यांत गॅसची किंमत झपाट्याने वाढत असल्याने ग्रामीण भागातील जनतेला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून परवडत नसल्याने पुन्हा स्वयंपाकाकरिता चुलीचा आधार घेण्यात येत आहे. त्यासाठी स्वयंपाक करण्याकरिता सरपण गाेळा करण्यासाठी उन्हातानात जंगलात धाव घेण्याची वेळ आली आहे़
शासनाने जंगलतोड होऊ नये व महिलांना सुद्धा स्वयंपाक करताना धुराचा त्रास होऊ नये या उदात्त हेतूने पर्यावरणयुक्त गाव संकल्पना चूलमुक्त धूरमुक्त अभियान राबून गरिबांना सबसिडीवर केवळ १०० रुपयांत गॅस सिलिंडर दिले होते. त्यामुळे गरिबांनी सुद्धा प्रतिसाद देऊन गॅस सिलिंडरचा वापर पसंत केला होता; परंतु या चार- पाच महिन्यांत गॅसचे दर वाढल्याने गरिबांना सिलिंडर वापरणे कठीण झाले आहे. त्यामुळे गोरगरीब मजुरांनी शेतातून लाकूड फाटा जमा करून चूल पेटवावी लागत आहे. ई क्लास जमिनी नागरिकांनी वहिती केल्यामुळे गुरांना चराईकरिता जंगल नसल्याने दिवसेंदिवस गुरेढोरे यांची संख्या घटली आहे. झाडेसुद्धा कटाई करण्याकरिता शासनाची मनाई असल्याने नागरिक चक्क कपाशी पिकाची उलंगवाडी झाल्याने स्वयंपाक करण्याकरिता वाळलेले पऱ्हाटी व तुरीची धस्कटे जमा करीत असल्याचे चित्र परिसरात आहे़
मजुरी करावी की सरपण गाेळा करावे
ग्रामीण भागात सध्या शेती मशागतीची कामे सुरू आहेत. दुसरीकडे अनेक महिलांना सरपण गाेळा करावे की सरपण गाेळा करावे, असा प्रश्न पडला आहे. अगोदरच किराणा मालासह इतर जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले असल्याने आर्थिक बाजू कोलमडली आहे. शेतातील कपाशी गाडी-बैलांनी घरी आणून बारा महिने पुरेल या बेताने गंजी करून ठेवल्या जात आहे. कोरोना संसर्ग आजाराने सुद्धा कहर केल्याने नागरिक हतबल झाले आहेत.