विनापरवाना जैविक इंधन विकणारे केंद्र सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:26+5:302021-08-28T04:38:26+5:30
जिल्ह्यात विविध ठिकाणी ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर चारचाकी वाहनांमध्ये लागणारे जैविक इंधन विक्री केंद्र कोणतीही परवानगी न घेता सुरू ...

विनापरवाना जैविक इंधन विकणारे केंद्र सील
जिल्ह्यात विविध ठिकाणी ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर चारचाकी वाहनांमध्ये लागणारे जैविक इंधन विक्री केंद्र कोणतीही परवानगी न घेता सुरू करण्यात आलेले आहेत. या विक्री केंद्रामार्फत जैविक इंधनाची विक्री करण्यात येत आहे. जैविक इंधनाची ज्वलनशीलता कमी असल्याने त्याचा वाहनांवर विपरीत परिणाम होतो. असे जरी असले तरी या इंधनाची विक्री करण्याकरिता आवश्यक असलेली परवानगी जिल्ह्यात एकाही जैविक इंधन विक्री केंद्राने घेतली नसल्याचे चित्र आहे. यामुळे या विक्री केंद्राचा मोठ्या प्रमाणात गोरखधंदा सुरू असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी १० ऑगस्टला जिल्ह्यातील अशा जैविक इंधन विक्री केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले होते. यावर कारवाई म्हणून खामगाव जवळ असलेल्या सुटाळा येथील एक केंद्र सील करण्यात आला आहे.
उर्वरित केंद्रांचे काय?
जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर एक जैविक इंधन विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राची संख्या जिल्ह्यात शेकडोंच्या घरात असून, केंद्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर जैविक इंंधन विक्री होत आहे. त्यातील एका केंद्रावर कारवाई जरी करण्यात आली असली तरी उर्वरित केंद्राचे काय, असा सवाल यानिमित्ताने पुढे येत आहे.