उड्डाणपुलावर दुचाकींचा अपघात, विद्यार्थिनी ठार, दुसरी जखमी
By सदानंद नाईक | Updated: April 15, 2024 21:40 IST2024-04-15T21:40:39+5:302024-04-15T21:40:53+5:30
या अपघाताची माहिती समजताच एकच धावपळ झाली.

उड्डाणपुलावर दुचाकींचा अपघात, विद्यार्थिनी ठार, दुसरी जखमी
शेगाव (बुलढाणा) : शहरातील उड्डाणपुलावर एका अज्ञात दुचाकीने स्कुटीला धडक दिल्याने त्यावरील एक विद्यार्थिनी ठार तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजताचे दरम्यान घडली.
शहरातील अकोट रोड भागात राहणाऱ्या दोन विद्यार्थिनी स्कुटीने शिकवणी वर्गातून घराकडे निघाल्या होत्या. दरम्यान, उड्डाणपुलावर अज्ञात दुचाकीने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. त्यामध्ये भारती सुनील दामोदर ही विद्यार्थिनी जागीच ठार झाली तर दुसरी विद्यार्थिनी साक्षी विलास माळी ही गंभीररीत्या जखमी झाली. दोन्ही मुली माऊली इंजिनिअरिंग कॉलेजला द्वितीय वर्षात शिकत होत्या.
या अपघाताची माहिती समजताच एकच धावपळ झाली. जखमी विद्यार्थिनींना येथील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. भारती दामोदर हिला तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच साक्षी माळी गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी शहर पोलिसांनी पंचनामा केला. तसेच जखमीची विचारपूस केली. उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती.