धरणातील गाळात अडकल्यानं २ मेंढपाळांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 19:01 IST2018-04-29T18:59:16+5:302018-04-29T19:01:05+5:30
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

धरणातील गाळात अडकल्यानं २ मेंढपाळांचा मृत्यू
बुलडाणा: पाणी पिण्यासाठी धरणात उतरलेल्या दोन मेंढपाळांचा गाळात अडकून मृत्यू झाल्याची घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. खामगावमधील ग्राम वडजीभेंडी येथील धरणात ही घटना घडली
भालेगाव बाजार येथील निंबाजी खाडपे व नांद्री येथील मंगेश हटकर हे धरणाच्या परिसरात मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. दुपारच्या सुमारास हे दोघेजण पाणी पिण्यासाठी धरणात गेले असता एकजण गाळात फसला. तर दुसरा त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाळात अडकला. घटनेची माहिती कळताच नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोघेही मृत्यूमुखी पडले होते. घटनेची माहिती पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याला कळवण्यात आल्यावर पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश मिश्रा यांच्यासह पोहेकॉ चोपडे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोघांचे देह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक ओमप्रकाश मिश्रा, पोहेकॉ चोपडे करत आहेत.